हा कसला ‘वचननामा’, हा तर आपल्या चुकांचा ‘कबुलनामा’

भाजपच्या जाहीरनाम्याचे काँग्रेसकडून ‘पोस्टमार्टम’

* अमरावतीला ‘भकास’ करण्याचा आरोप

अमरावती / 9 जानेवारी – आगामी 15 जानेवारी रोजी होणार्‍या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये सुरक्षित आणि विकसित अमरावती बनवण्याचे 100 टक्के आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, काँग्रेसने या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली असून, याला ‘वचननामा’ नव्हे तर भाजपच्या चुकांचा ‘कबूलनामा’ म्हटले आहे. शहरात आयोजित एका पत्रकार परिषदेत काँग्रेसने भाजपच्या जाहीरनाम्याचा अक्षरशः ‘पोस्टमार्टम’ केला.
काँग्रेस पदाधिकार्‍यांनी आरोप केला की, 2017 ते 2022 या काळात महापालिकेत भाजपची सत्ता होती आणि त्यानंतरही राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आहे. अशा स्थितीत भाजपने जाहीरनामा काढण्याऐवजी ‘कार्यपूर्ती अहवाल’ (रिपोर्ट कार्ड ) सादर करायला हवा होता. मागील साडेआठ वर्षांत शहरासाठी नेमकी कोणती कामे केली आणि त्यातील किती पूर्ण झाली, याचे उत्तर जनतेला मिळणे आवश्यक होते. मात्र, विकासकामे शून्य असल्याने जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा खोटा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 2017 मध्ये भाजपने अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आज शहराची अवस्था ‘भकास सिटी’ सारखी झाली आहे. काँग्रेसच्या काळात झालेली विकासकामेही भाजपच्या सत्ताकाळात धुळीस मिळाली आहेत. शहर प्रशासन पूर्णपणे कंत्राटदार आणि भूमाफियांच्या ताब्यात गेले असून, लोकप्रतिनिधींच्या संगनमताने सर्वसामान्यांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. ब्रिटिशकालीन नेहरू मैदान आणि रेल्वे स्टेशनची जागा विकून पैसा कमावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.भाजपने स्वच्छ आणि सुंदर अमरावतीचा दावा केला असला तरी, प्रत्यक्षात शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. आरोग्य सेवांची दुरवस्था झाली असून, सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांच्या मानधनासाठी काँग्रेसला आंदोलने करावी लागली. चित्रा चौक उड्डाणपुलाचे काम गेल्या 7 वर्षांपासून रखडले आहे. उच्च न्यायालयाने 31 डिसेंबरची डेडलाईन देऊनही हे काम पूर्ण झालेले नाही. याशिवाय, महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात 1100 सफाई कामगार असणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात केवळ 400 ते 500 कामगार कार्यरत आहेत, ज्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश सचिव भैय्या पवार, प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, महिला शहराध्यक्ष जयश्री वानखडे व युवक काँग्रेस शहराध्यक्ष वैभव देशमुख उपस्थित होते.
जनतेच्या हक्कावर डल्ला: काँग्रेसचे गंभीर आरोप-भकास अमरावती: स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराला भकास केल्याचा आरोप. प्रशासकीय अपयश: शहरात प्रशासनाऐवजी कंत्राटदार आणि भूमाफियांचे राज्य. रखडलेले प्रकल्प: चित्रा चौक उड्डाणपूल 7 वर्षांपासून अपूर्ण, न्यायालयीन आदेशाचीही पायमल्ली. स्वच्छतेचा अभाव: 1100 ऐवजी केवळ 400 सफाई कामगार; शहरात कचर्‍याचे साम्राज्य. आरोग्य दुर्लक्ष: डॉक्टरांचे मानधन प्रलंबित आणि मूलभूत सोयींचा अभाव.

संबंधित बातम्या

Back to top button