माध्यमांचा वापर योग्य दिशेने करावा

गजानन चोपडे यांचे प्रतिपादन

* आयआयएमसीत मराठी पत्रकारिता दिनानिमित्त विशेष व्याख्यान

अमरावती /6 जानेवारी : माध्यमांची ताकद अफाट आहे. महापुरुषांनी ही ताकद ओळखूनच पत्रकारितेला शस्त्र बनविले आणि स्वातंत्र्याची चळवळ यशस्वी केली. आज तंत्रज्ञानाच्या विस्ताराने ही माध्यमे अधिक बलशाही झाली असून त्यांचा वापर योग्य दिशेने करण्यासाठी नव तंत्रज्ञान अवगत करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दैनिक लोकमतचे आवृत्ती संपादक गजानन चोपडे यांनी केले. ते आयआयएमसीत पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
भारतीय जन संचार संस्थान (आयआयएमसी) पश्चिम क्षेत्रीय परिसरात मराठी पत्रकारिता दिनानिमित्त दिनांक 6 जानेवारी रोजी विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून दैनिक लोकमतचे आवृत्ती संपादक गजानन चोपडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष क्षेत्रीय संचालक डॉ. राजेश सिंह कुशवाहा होते. यावेळी विचारमंचावर डॉ विनोद निताळे, डॉ आदित्य मिश्रा, डॉ प्रमोद गायकवाड, जयंत सोनोने, रोहन तायडे उपस्थित होते.
संपादक गजानन चोपडे पुढे म्हणाले, माध्यमांच्या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाच्या विस्ताराने या संधी अधिक विस्तीर्ण झाले असून त्या मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नव तंत्र शिकले पाहिजे. आपल्या कामाशी प्रामाणिक राहा, अधिकाधिक पुस्तके वाचन करा आणि वेगवेगळ्या शैलीमध्ये लिहिण्याचा सराव करा असा सल्ला देखील त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. फेक न्युज सारखे आव्हान आता पत्रकारिते पुढे उभे आहे, या आव्हानांशी सामना करण्यासाठी स्वतःला तयार करा असे ही ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. तत्पूर्वी पत्रकारिता दिनानिमित्य आयोजित पुस्तक प्रदर्शनी आणि जुने वर्तमानपत्रांच्या छायाचित्र दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यानी दोन प्रायोगिक वृतपत्र विशेषांक म्हणून प्रकाशित केले. यावेळी शुभम घोडके, पुष्पक गोंडाणे, कल्याण शोभना, स्वप्नील माहुरे, खुशबू आणि पालाश प्रिया या विद्यार्थ्यानी मराठी पत्रकारितेवर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ राजेश कुशवाहा म्हणाले, स्वातंत्र्यानंतर पत्रकारितेने विकसित भारतासाठी मोठे योगदान दिले आहे. लोकांना सुसंस्कृत करण्याचे कार्य पत्रकारितेने केले आहे. या कार्यात सहभागी होणेसाठी विद्यार्थ्यानी सत्य आणि असत्य यातील सीमा ओळखून पुढे मार्गक्रम करावे. आपल्या कामाप्रती प्रामाणिक, प्रतिबद्ध आणि समाज हित जपावे असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनोद निताळे यांनी केले. सूत्रसंचालन निशिगंधा चौधरी व विवेक बडे याने तर आभार रजनीश शुक्ल याने मानले.याप्रसंगी मराठी, हिंदी आणि इंग्रजी पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button