21 किलोमीटरच्या शर्यतीत राज तिवारी व साक्षी जड्याल यांचा शानदार विजय

अटल दौड राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेत 2164 धावपटूंनी घेतला सहभाग

* धावपटू टीव्हीएस स्पोर्ट व ज्युपिटर पुरस्काराने सन्मानित

* उत्कृष्ट नियोजन, सुरक्षितता व सेवाभावामुळे स्पर्धा ठरली संस्मरणीय

अमरावती /25 डिसेंबर : माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त गुरुकुल बहुद्देशीय शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा अथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अटल दौड राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा गुरुवारी सकाळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडली. राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या तब्बल 2164 धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत अमरावती शहराला क्रीडामय उत्सवाचे स्वरूप प्राप्त करून दिले. स्थानिक दसरा मैदान येथे सकाळी सहा वाजता स्पर्धेला प्रारंभ झाला. या वेळी प्रमुख आयोजक तुषार भारतीय, खासदार डॉ. अनिल बोंडे, निवेदिता चौधरी, माजी महापौर चेतन गावंडे, अमरावती जिल्हा अथलेटिक संघटनेचे सचिव प्रा. अतुल पाटील, ऋषी खत्री, प्रशांत शेगोकार, सचिन मोहोड, डॉ. शाम राठी, डॉ. मिलिंद पाठक आदी मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची औपचारिक सुरुवात केली.
या स्पर्धेमध्ये 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन, 10 किलोमीटर, 8 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर तसेच ‘रन फॉर अमरावती’ या खुल्या गटातील शर्यती पार पडल्या. सर्व गटांमध्ये पुरुष, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच संस्थात्मक गटांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. विशेष म्हणजे अमरावती शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन पुरुष गटात राज तिवारी यांनी प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळवले, तर महिला गटात साक्षी जड्याल यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजय संपादन केला. पुरुष विजेत्याला टीव्हीएस स्पोर्ट तर महिला विजेत्याला टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी पुरस्कार म्हणून देण्यात आली. यासह इतर गटांतील विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व पदक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचा मार्ग अत्यंत काटेकोरपणे नियोजित करण्यात आला होता. धावपटू दसरा मैदान, राजापेठ, कवर नगर, फरशी स्टॉप, दस्तूर नगर, यशोदा नगर, काँग्रेस नगर, बियाणी चौक, वेलकम पॉइंट, पंचवटी चौक, राठी नगर, शेगाव नाका, विलास नगर, चौधरी चौक, जयस्तंभ चौक, जवाहर गेट, गांधी चौक, भुतेश्वर चौक, रवी नगर, सातूर्णा चौक, साईनगर चौक, बेनाम चौक, नवाथे चौक असा संपूर्ण मार्ग पूर्ण करून पुन्हा दसरा मैदान येथे पोहोचले.
धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय पथके, वेदनाशक स्प्रे तसेच आवश्यक औषधांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक चौकात स्वयंसेवक व नागरिकांनी उभे राहून धावपटूंना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिले. स्पर्धेनंतर सर्व सहभागींसाठी अल्पोपहाराची व वैद्यकीय तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती.
राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेले धावपटू स्पर्धेच्या आदल्या रात्रीच अमरावतीत दाखल झाले होते. त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था व्यवस्थापन समितीच्या वतीने लोहाना महाजन वाडी येथे करण्यात आली होती. संपूर्ण आयोजन अतिशय नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याने सहभागी धावपटूंनी समाधान व्यक्त केले. अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिन मोहोड, तुषार चौधरी, निरंजन दुबे, राम शेगोकर, मंदार नानोटी, शुभम वैष्णव, भूषण हरकूट, कार्तिक नाचनकर, सौरभ कालबांडे, गोपाळ दलाल, सुधीर पावडे, आकाश वाघमारे, सुरज जोशी, योगेश निमकर, जयेश गायकवाड, कधी देशपांडे, सौरभ वडुरकर, योगेश उघडे, राजेश जगताप, बंडू विघे यांच्यासह अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस बंदोबस्त, वाहतूक पोलीस, शिक्षक तसेच पाचशेहून अधिक स्वयंसेवक संपूर्ण मार्गावर तैनात होते. क्रीडा, आरोग्य आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धा दरवर्षी विविध गटांमध्ये आयोजित केली जाते. यंदाच्या स्पर्धेला लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि यशस्वी आयोजनामुळे ही स्पर्धा अमरावतीच्या क्रीडा इतिहासात एक महत्त्वाचा ठसा उमटवणारी ठरली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button