माजी शिक्षणाधिकारी काटोलकर अटकेत

12 कोटींचा अपहार केल्याचा ठपका

* शिक्षण विभागातील घोटाळा प्रकरणी कारवाई, पोलिस कोठडीत रवानगी

नागपूर/23 डिसेंबर -राज्यात गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि शालार्थ वेतन प्रणाली घोटाळ्यात नागपूर विशेष तपास पथकाने मोठी कारवाई केली आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र शंकरराव काटोलकर यांना सायबर सेलने अटक केली असून, त्यांच्यावर 12 कोटी रुपयांहून अधिक रकमेची शासकीय फसवणूक केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे.
नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केलेल्या तक्रारीनंतर या महाघोटाळ्याचे पदर उलगडण्यास सुरुवात झाली. तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपींनी ’शालार्थ’ या ऑनलाइन वेतन प्रणालीचा बेकायदेशीररीत्या वापर केला. बनावट शालार्थ आयडी आणि ड्राफ्ट तयार करण्यात आले. अस्तित्वात नसलेल्या किंवा बनावट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या नावाने वेतन आणि इतर देणी काढण्यात आली. या प्रक्रियेत सरकारी तिजोरीचे 12 कोटी 3 लाख रुपयांचे नुकसान झाले. रवींद्र काटोलकर हे 2021 ते 2022 या काळात नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होते. तपासात समोर आले की, बनावट विद्यार्थी ओळखपत्रे आणि बोगस शिक्षकांच्या माहिती बाबत कल्पना असतानाही काटोलकर यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता पगाराचे प्रस्ताव मंजूर केले. स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर करत शासनाची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हायप्रोफाईल घोटाळ्यात एसआयटीने आतापर्यंत 26 जणांना अटक केली आहे. यामध्ये शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, लिपिक, शाळांचे मुख्याध्यापक, संचालक आणि शिक्षकांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.मंगळवारी अटक केल्यानंतर रवींद्र काटोलकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्यांना 25 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या काळात या घोटाळ्यातील आणखी काही धागेदोरे आणि लाभार्थींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button