34 हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित
वीजबिल भरण्याला प्रतिसाद न देणार्यावर महावितरणची कारवाई

वीज बिल वसुलीत अमरावती परिमंडळ शेवटच्या तीन परिमंडळात
अमरावती /23 डिसेंबर : वीज ही अत्यावश्यक सेवा असूनही परिमंडळातील हजारो वीज ग्राहक वीजबिल भरण्यास चालढकल करतात, त्यामुळे नाईलाजास्तव महावितरणला धडक मोहिम घेत कारवाईला सुरूवात करावी लागली असून, महावितरणच्या कारवाईत 39 कोटी 53 लाख रूपयाच्या थकबाकीसाठी परिमंडळातील लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील 33 हजार 845 वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
महावितरण ही वीज निर्मिती करणार्या कंपन्यांची एक ग्राहक असल्याने वेळेत देयके अदा करण्यासाठी प्रत्येक महिन्याचे वीज बिल शंभर टक्के वसूल होणे क्रमप्राप्त आहे. परंतू हजारो वीज ग्राहक वीजबिल भरण्याला प्राधान्यच देत नाही. शिवाय महावितरणच्या कर्मचार्यांनाही प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येते. परिणामी परिमंडळात दिवसेंदिवस महावितरणच्या थकबाकीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याचे 22 दिवस संपूनही वीजबिलाची वसूली डिसेंबर महिन्याच्या डिमांडच्या 62 % आणि एकुण थकबाकीच्या 28 % झाली आहे. त्यामुळे मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी वसूलीबाबत विभागनिहाय आढावा घेवून थकीत वीजबिलाच्या वसूलीसोबत थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे उद्धीष्ठ ठरवून दिले आहे. वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या कर्मचार्यांनी कारवाईच करावी आणि त्याची नोंद ऑनलाईन पोर्टल मध्ये करावी, अश्या स्पष्ट सुचना मुख्य अभियंता यांनी दिल्या आहेत. ऑनलाईन नोंद झाल्यास ग्राहकांना भरावा लागणार पुनर्जोडणी शुल्काचा भुर्दंड -वीज पुरवठा खंडित केल्यानंतर त्या ग्राहकाची नोंद ऑनलाईन केल्यानंतर, सुरक्षा ठेवीसह संपूर्ण थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय त्या थकबाकीदार ग्राह काचा वीज पुरवठा पुर्ववत करता येत नाही. सिंगल फेज ग्राहकांना भुर्दंड म्हणून 310 आणि थ्री फेज ग्राहकाला 530 रूपयाचे पुनर्जोडणी शुल्क आकारण्यात येते.
राज्यात महावितरणचे 16 परिमंडळ आहेत. परंतू वीजबिल वसूलीबाबत अमरावती परिमंडळांचा चौदावा क्रमांक लागतो. वीजबिल वसूलीतील उदासिनता ही महावितरणसाठी चिंता निर्माण करणारी असल्याने, महावितरणला नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित करण्यासारख्या मोहिमेला सामोरे जावे लागत आहे.




