लाडक्या बहिणीच अंजनगावचा कौल ठरवतील

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना विश्वास

* नगरपरिषद सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य

अंजनगाव सुर्जी । 18 डिसेंबर  : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगरपरिषद क्षेत्रात रस्ते, वीज, पाणी, रोजगार यांसारख्या मूलभूत समस्यांनी नागरिक हैराण झाले असून या सर्व प्रश्नांवर ठोस उपाय करण्यासाठी येथे शिंदे सेनेची सत्ता आवश्यक आहे, असे ठाम मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. येत्या 20 डिसेंबर रोजी होणार्‍या नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्पृहा डकरे यांच्यासह पक्षाच्या सर्व उमेदवारांना लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.नगराध्यक्षपद व सदस्य पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंजनगाव सुर्जी येथे दाखल झाले होते. प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला आणि विरोधकांवर जोरदार टीका करत विकासाचा अजेंडा मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सकाळी अमरावती विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता ते हेलिकॉप्टरने अंजनगाव सुर्जी येथे दाखल झाले. सारडा महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात हेलिकॉप्टर उतरताच माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, ज्ञानेश्वर धाने पाटील, पक्षाच्या उपनेत्या प्रीती बंड, जिल्हाप्रमुख श्याम देशमुख आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.यानंतर द्वारका चौकातून भव्य रोड शोला सुरुवात झाली. मुख्य मार्गांवरून निघालेली ही रॅली पानअटाई चौकात पोहोचताच प्रचारसभेत रूपांतरित झाली. कोणतीही औपचारिकता न करता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना थेट संबोधित केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांचा अजेंडा केवळ सत्तेसाठी नाही, तर विकास आणि परिवर्तनासाठी आहे. नागरिकांच्या समस्या सोडविणे हेच आपले खरे काम असल्याचे त्यांनी सांगितले. अंजनगाव सुर्जीमध्ये रस्ते, वीज, पाणी आणि रोजगाराच्या समस्या गंभीर आहेत. या सर्व समस्यांमधून नागरिकांना मुक्त करण्याचे काम शिंदे सेना करेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगरपरिषदेत शिंदे सेनेची सत्ता आल्यास नगरविकास विभागाच्या माध्यमातून अंजनगावचा सर्वांगीण विकास केला जाईल. शहानूर धरणातून घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. पाण्याचे थकीत बिल पूर्णपणे माफ करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठे उद्योग अंजनगाव परिसरात आणण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमी-अंजनगाव सुर्जी ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारी भूमी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यामुळेच आपण येथे आले आहोत. बारी समाजाचे गुरू रूपलाल महाराज यांचे स्मारक, बस स्थानक आणि शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. युवकांसाठी प्रशिक्षण योजना राबवून हाताला काम आणि रोजगार देण्यासाठी मोठे उद्योग येथे आणले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रोड-शोमध्ये उसळला जनसागर-द्वारका चौकातून निघालेल्या भव्य रोड शोमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. संपूर्ण अंजनगाव शहर भगवामय झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. खुल्या जीपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्पृहा डकरे, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, प्रीती बंड आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी अडीचच्या सुमारास उपमुख्यमंत्री अंजनगावातून रवाना झाले.

‘मी शब्द दिला, तर माघार घेत नाही’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत सांगितले की, एकदा कमिटमेंट केली की स्वतःचेही ऐकत नाही. जे बोलतो ते करतो, अन्यथा बोलतच नाही. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांच्या काळात लोकाभिमुख निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. पैसा कमावणे महत्त्वाचे नाही, तर माणसे जोडणे महत्त्वाचे असल्याचे सांगत अंजनगावच्या विकासासाठी विरोधकांना आता धडा शिकविण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सूचित केले.

संबंधित बातम्या

Back to top button