16 हजार सरकारी कार्यालयांना लागले महावितरणचे स्मार्ट (टीओडी) मीटर
मीटर पूर्णत: प्रमाणित, अचूक आणि मोफत

अमरावती /18 डिसेंबर : महावितरणच्या अमरावती परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या 15 हजार 965 शासकीय कार्यालयांना महावितरणचे स्मार्ट ( टिओडी ) मीटर लावण्यात आले आहे. स्मार्ट मीटर हे पूर्णत: प्रमाणित असून अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याचे मीटर वाचन स्वंयचलीत पध्दतीने मीटरव्दारेच होणार असल्याने सरासरी वीजबिल, मीटर रिडींग झाले नाही, अशा तक्रारी शुन्य होवून वीज ग्राहकांना अचूक आणि वेळेत वीज बिल मिळणार आहे.
राज्यात कृषी ग्राहक वगळता सर्वच वर्गवारीतील वीज ग्राहकांना स्मार्ट (टिओडी) मीटर लावण्यात येत आहेत. यात शासकीय कार्यालयाचा देखील समावेश आहे. नवतंत्रज्ञानावर आधारीत असलेले हे मिटर तांत्रिकदृष्या अधिक स्मार्ट असले तरी हे मीटर मोफत बसविण्यात येत आहे, त्यामुळे याचा वीज ग्राहकांना कुठलाच आर्थिक भुर्दंड बसणार नाही. शिवाय या मीटरमध्ये मानवी हस्तक्षेपाला वाव नाही. अमरावती परिमंडळात टप्या – टप्प्याने सर्वच वर्गवारीतील (कृषी ग्राहक वगळून) वीज ग्राहकांना स्मार्ट ( टिओडी) मीटर बसविण्यात येत असून, सुरूवातीच्या काळात सरकारी कार्यालये, सरकारी निवासस्थाने, मोबाईल टॉवर, नादुरूस्त असलेले मीटरच्या ठिकाणी हे मीटर बसविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय नविन वीज जोडणी देतांनाही स्मार्ट (टिओडी) मीटर बसविण्यात येत असून सोलर नेट मीटरींगसाठी त्याचा वापर करण्यात येत आहे.अमरावती परिमंडळात विविध शासकीय कार्यालयात बसविण्यात आलेल्या 15 हजार 965 मीटरपैकी अमरावती जिल्ह्यात 7 हजार 706 आणि यवतमाळ जिल्ह्यातील 8 हजार 259 शासकीय कार्यालयांना स्मार्ट (टिओडी) मीटर बसविण्यात आले आहे. स्मार्ट (टिओडी) मीटर हे अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत असल्याने ग्राहकांना वीज वापराचे अचूक वीजबिल मिळणार आहे. तसेच मोबाईल एप्लिकेशनच्या माध्यमातून प्रतितासाचा वीज वापर कळतो, त्यामुळे वीज वापरावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते.




