विदर्भात थंडीची लाट तीव्र

शेतकर्‍यांसाठी अनुकूल हवामान

अमरावती /15 डिसेंबर : विदर्भात सध्या थंडीने जोर धरला आहे. अमरावतीसह इतर जिल्ह्यांमध्ये तापमानात घट आणि थंड वार्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दिवसा आणि रात्री वेगवेगळ्या ठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करत आहेत.
अमरावती शहरात काल नोंदवलेले किमान तापमान 12.7 अंश सेल्सिअस होते, तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये 14 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदवले गेले. सकाळी व संध्याकाळी रस्ते सुनसान दिसतात. थंडीमुळे लोक दिवसभर उबदार कपडे घालून फिरतात, तर कामगार, रिक्षाचालक आणि पादचारी शेकोट्या पेटवून उब घेत आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी वृद्ध आणि लहान मुलांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. थंड हवामानामुळे सर्दी, खोकला आणि इतर श्वसनसंबंधी आजारांचा धोका वाढतो.हवामान खात्याचे अहवाल सांगतात की, पुढील आठवडाभर विदर्भात अशीच थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. थंडीमुळे तापमान आणखी खाली जाऊ शकते, ज्यामुळे नागरिकांसाठी परिस्थिती अधिक कठीण होईल. शेतकर्‍यांसाठी मात्र ही परिस्थिती दिलासादायक आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, सध्या सुरू असलेले थंड हवामान गहू, हरभरा आणि इतर रब्बी पिकांच्या वाढीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे या हवामानामुळे चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळेल. विदर्भातील नागरिकांना सध्या थंडीच्या लाटीत सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे, तर शेतकर्यांसाठी ही परिस्थिती उत्पादनासाठी अनुकूल ठरत आहे.

विदर्भातील प्रमुख शहराचे तापमान

अमरावती –           12.7 अंश
अकोला –              13.2 अंश
बुलढाणा –             13.5 अंश
यवतमाळ –            13.8 अंश
वाशिम –               13.6 अंश
वर्धा –                   13.9 अंश
नागपूर –               13.4 अंश
भंडारा –               13.7 अंश
गोंदिया –              13.3 अंश
चंद्रपूर –               13.9 अंश
गडचिरोली –         13.8 अंश

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button