चिखलदरा आदिवासी बहुल भागात शिक्षणाची दुरावस्था
बहुतेक शाळा बंद असल्याचा आरोप

अमरावती /7 डिसेंबर – अतिशय दुर्गम भाग असलेल्या चिखलदरा तालुक्यातील आदिवासी बहुल एकताई केंद्रामध्ये शिक्षकांची निर्माण झालेली कमतरता आणि शिक्षण विभागाचे दुर्लक्ष यामूळे या केंद्रातील बहुतेक शाळा बंद असल्याचा आरोप गावकर्याकडून करण्यात येत आहे. या शैक्षणिक कोंडमार्यामूळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या बदल्या, कंत्राटी भरती प्रक्रियेत एकताई केंद्र पुर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले आहे. याला पूर्णपणे शिक्षणाधिकारी हेच जबाबदार असल्याचा आरोप शिक्षक वर्गाकडून करण्यात येत आहे. मेळघाटातील आरोग्य विभाग जसा रिक्त पदामुळे नेहमी चर्चेत असतो त्याच धरतीवर मेळघाटच्या शिक्षण विभागाची अवस्था झाली आहे. किंबहूना त्यापेक्षा अधिक वाईट परिस्थीती निर्माण झाली आहे. अति दुर्गम भाग असलेल्या एकताई केंद्रात एकूण 10 शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेत 2 शिक्षक असणे नियमानुसार आवश्यक आहे.
मात्र सध्याच्या परिस्थितीत या प्रत्येक शाळेवर एक शिक्षक कार्यरत आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या बदल्या आणि कंत्राटी भरतीमध्ये एकताई केंद्र दुर्लक्षित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढत असतांना शिक्षकांची कमतरता वाढत असून अनेक शाळा केवळ एकाच शिक्षकाच्या भरोश्यावर चालवल्या जात आहे. या परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे केवळ अशक्य झाले असून संतप्त स्थानिक पालकांनी जोपर्यंत दुसरा शिक्षक शाळेत येत नाही तोपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा इशारा दिला आहे. या शैक्षणिक कोंडमार्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या केंद्रामधील शैक्षणिक कोंडमारा अधिक गंभीर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रशासनाचा गोंधळ एकताई केंद्रामध्ये मागील 1 वर्षापासून जवळपास सर्व शिक्षकांच्या बदल्या होवून देखील त्यांच्या जागेवर कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. नुकतेच न्यायालयाने फटकारल्यानंतर मेळघाट या दुर्गम भागात शासनाला 3 प्रधान सचिव व 11 आय.ए.एस. अधिकारी यांच्या जम्बो टिमने अति दुर्गम भागातील मेळघाट परिसरात आरोग्य, शिक्षण, बालमृत्यु, कुपोषण या संदर्भात सर्च ऑपरेशन केले मात्र आता त्यांच्या अहवालातून दुर्गम भागातील बहूल आदिवासी नागरिकांना काय दिलासा मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.




