लोककल्याणाच्या योजनांमध्ये खंड पडू देणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

* सरकारच्या वर्षपूर्तीवर वाचला कामांचा पाढा
छत्रपती संभाजीनगर/5 डिसेंबर -राज्यात सत्तेमध्ये येऊन महायुती सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. याचपार्श्वभूमीवर विरोधक महायुती सरकारवर टीका करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारने वर्षभरात केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवली आहे.
महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या महायुतीला प्रचंड आशीर्वाद दिला आणि 232 जागा आम्हाला मिळाल्या. आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे. या एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला विकासासाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. महाराष्ट्राचं प्रशासन हे एका संस्थेसारखं निर्माण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. विकासाची कामं आणि लोककल्याणाच्या योजना या दोन्हीमध्ये कुठेही खंड पडू दिलेला नाही. लाडक्या बहिणींचा योजना असेल, शेतकर्यांना मोफत वीज देण्याचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. त्यातच आपण सर्वांनी बघितलं असेल तर आम्ही विश्वविक्रम देखील केलेला आहे. सौरकृषी पंप जी शेतकरी आणि शेतीची जीवनरेषा आहे, असे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आपण एका महिन्यामध्ये 45 हजार 911 पंप लावून गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं देशामध्ये 9 लाख पंप लागले आहेत, त्यातले 7 लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावले आहेत. आपण शेतकर्यांसोबतची आमची चर्चा बघितली असेल तर शेतकर्यांना दिवसा आणि मोफत वीज मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये अतिशय समाधान आहे. त्यासोबत आमची जी कृषी सौर वाहिनीची योजना आहे, ती पुढच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करू. असे केल्याने महाराष्ट्र पहिलं राज्य असेल, जे शेतकर्यांना दिवसा वीज देतो आणि तेही सौर वीज देतो. त्यामुळे मला असं वाटतं खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, पायाभूत सुविधांची कामे आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. त्याची पावती आम्हाला जनता देत आहे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली. तुम्हा कुठल्या गोष्टीची खंत आहे का की, एका वर्षामध्ये काही गोष्टी झाल्या नाहीत. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही तसं जर मला विचाराल, तर हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं असा विचार करून मला रात्री झोप लागत नाही. कारण अनेक गोष्टी करायच्या आहेत. एक वर्षाचा काळ हा मोठा होत नाही. त्यामुळे निश्चितच खंत नाही, पण मला एक उत्सुकता आहे किंवा भावना आहे की, अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि त्या आम्ही करू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.




