अमरावती-मुंबई विमानसेवा 15 दिवसांसाठी बंद

दाट धुक्यामुळे प्राधिकरणाचा निर्णय; प्रवाशांना संदेशातून माहिती

पुढील निर्णय हवामानावर अवलंबून, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

अमरावती /3 डिसेंबर : बेलोरा विमानतळावरून सुरू असलेली अमरावती-मुंबई हवाई सेवा दाट धुक्याच्या प्रचंड प्रमाणामुळे 1 डिसेंबरपासून थेट 15 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या वेळी परिसरात दाट धुके पसरत असून, दृश्यता अत्यंत कमी झाल्याने विमानतळावर सुरक्षित उड्डाणासाठी आवश्यक तांत्रिक मानकांची पूर्तता होत नाही. कार्यालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धुक्यामुळे निर्माण झालेली प्रतिकूल दृश्यता हेच उड्डाणे रद्द करण्यामागील मुख्य कारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अमरावतीवरून मुंबईकडे आठवड्यातून चार दिवस नियमित हवाई सेवा सुरू होती. या सेवेमुळे व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, प्रशासकीय कामकाज तसेच पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रवासी लाभ घेत होते. मात्र अचानक हवामानात झालेल्या बदलांमुळे ही सर्व सेवा अनिश्चित काळासाठी विस्कळीत झाली आहे. धुक्याची तीव्रता इतक्या पातळीवर पोहोचली की, विमानाचे नेमके उड्डाण व अवतरण मार्ग सुरक्षितपणे समजणे कठीण होऊ लागले. परिणामी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत विमानसेवा तात्पुरती थांबविण्याचा निर्णय घेतला गेला.
दरम्यान, या कालावधीत प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिकिटाचा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भातील संदेश भ्रमणध्वनीद्वारे तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. अनेक प्रवाशांनी उड्डाण रद्द झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असली तरी, हवामानातील तीव्र बदल लक्षात घेता हा निर्णय अपरिहार्य असल्याचेही ते मान्य करत आहेत. धुक्याचा प्रभाव फक्त अमरावती विमानतळापुरता मर्यादित नाही. नागपूर विमानतळावरदेखील दृश्यतेचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक विमानसेवा उशिराने किंवा फेरबदल करून सुरू आहेत. त्यामुळे अमरावतीतील प्रवाशांनी पर्याय म्हणून नागपूर मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, तापमानातील घसरण आणि रात्रीच्या वेळी वाढणार्‍या आर्द्रतेमुळे धुक्याचे प्रमाण काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 15 डिसेंबरनंतरही हवामान स्थिती जसंच्या तशी राहिल्यास उड्डाणे वेळेवर सुरू होतील की नाही, याबाबत विमानतळ प्रशासन निश्चित भूमिका मांडू शकत नाही. अमरावतीकरांसाठी ही सेवा केवळ प्रवासाची सुविधा नव्हे तर शहराच्या वाढत्या गरजांना अधोरेखित करणारी महत्त्वाची पायाभूत सुविधा ठरली होती. त्यामुळे ही सेवा थांबल्याने व्यापार, उद्योग, वैद्यकीय आपत्कालीन प्रवास आणि शासकीय कामकाजांवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासन हवामानातील सुधारणा होताच सेवा पूर्ववत सुरु करण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. धुक्याचे संकट ओसरून दृश्यता सुधारल्यानंतर उड्डाणांना हिरवा कंदील मिळणार आहे. तोपर्यंत अमरावतीकरांना हवाई प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आह.

समस्या लवकरच सुटेल

बेलोरा विमान तळा वरील तांत्रिक सुधारणा सुरू असल्याने विमान सेवा तात्पुरती स्थगित आहे. ही कामे सुरक्षिततेसाठी आवश्यक असून जलदगतीने पूर्ण केली जात आहेत. अडचण तात्पुरती आहे; सेवा लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. प्रवाश्यांना होत असलेली अडचण लक्षात घेता कारवाईचे निर्देश दिले आहे.
-अनिल बोंडे, खासदार

मंत्र्यांना समस्यांची माहिती दिली

विमान सेवा उपलब्ध झाल्या पासून यांना त्या कारणाने अनिय मितता दिसून येते. या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री व विमान प्राधिकरण यांच्या सोबत बोलून नाराजी व्यक्त केली. सुधारणा करु असेच उत्तर मिळत आहे. या अनियमिततेमुळे नागरिकांना त्रास सहण करावा लागत आहे. या गंभीर बाबीकडे सरकार व प्राधिकरणाने लक्ष घालणे गरजेचे आहे.
– बळवंत वानखडे, खासदार

उड्डाणावर वातावरणाचा परिणाम

विदर्भात धुक्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामूळे उड्डाण घेणे लहान विमानांना शक्य नाही. हवा मानातील धुक्याच्या प्रमाणाचा जेटसारख्या मोठ्या विमानावर कोणताही फरक पडत नाही. आता तरी 15 डिसेंबर पर्यंत स्थगीती दिली असली तरी अशिच परिस्थिती राहीली तर ही तारीख वाढूही शकते.
– संजय खोडके, आमदार

जनप्रतिनिधींचे दुर्लक्ष

सुरुवातीपासूनच जन प्रतिनिधीचे विमान सेवे प्रशासना कडे गांभीर्याने लक्ष घातले नाही. अत्यंत महत्वकांक्षी योजना म्हणून या विमानसेवेकडे पाहीले जाते मात्र जनप्रतिनिधीच्या अक्षम्य दुलर्क्षितपणामुळे विमान सेवेला गालबोट लागत आहे. नागरिकांनी या बाबत आवाज उठवावा.
– सुनिल देशमुख,
माजी पालकमंत्री

संबंधित बातम्या

Back to top button