खा.संजय देशमुखांच्या कारला भीषण अपघात
सुदैवाने बचावले, टिप्परच्या धडकेत वाहनाचं मोठं नुकसान

यवतमाळ/26 फेब्रुवारी : यवतमाळ-वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला (क्र. एमएच-29 बीव्ही-0333) अपघात झाला. दारव्हा-दिग्रस मार्गावर साखरा येथील कार्यक्रमातून गुरूवारी सायंकाळी 7 वाजता खासदार देशमुख हे वाहनाने दिग्रसकडे जात असताना एमएच-40 बीजी-6403 क्रमांकाच्या टिप्परने मागून जोरात धडक दिली. कारचा मागील भाग क्षतीग्रस्त झाला. यात खासदारांच्या मानेला झटका पडला तर चालकाच्या हाताला जखम झाली आहे.अपघाताची माहिती मिळताच दिग्रस पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तर खासदार संजय देशमुख हे दिग्रस येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले.
आज झालेल्या अपघातात माझ्यासह माझ्या सहकार्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. सर्व जण सुरक्षित असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. आपल्या आशीर्वादाने मी व माझे सहकारी सुखरूप आहोत. उद्यापासून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सेवेत हजर आहे.
– खा.संजय देशमुख
यवतमाळ-वाशिम लोकसभा




