सपकाळ यांच्या डोक्यावर परिणाम
चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल

नागपूर /15 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या कथित वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भाजपकडून हल्लाबोल केला जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजप, काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आले. हर्षवर्धन सपकाळ यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा राहुल गांधीही त्यांच्या वक्तव्याशी सहमत असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संवेदना असतील, तर त्यांनी पुढील तीन दिवसांत हर्षवर्धन सपकाळ यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा राहुल गांधी हे या वक्तव्याचे समर्थन करत असल्याचा संदेश जाईल, असा आरोपही बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केला. हर्षवर्धन सपकाळ यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांना मनोरुग्णालयात पाठवण्याची गरज आहे. अशा व्यक्तीची पक्षातून हकालपट्टी व्हायलाच हवी. तसेच, उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर गप्प न बसता, लाचारी पत्करण्याऐवजी तातडीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी मागणीही त्यांनी केली.दरम्यान,या प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करताना ठाकरेंनी आता लाचारी पत्करण्याऐवजी ’मविआ’तून बाहेर पडले पाहिजे असे स्पष्ट केले.पुण्यात भाजपच्या निषेध आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अरेरावीबद्दल बावनकुळेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हर्षवर्धन सपकाळ यांच्या चुकीच्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी जर काँग्रेस कार्यकर्ते वागणार असतील, तर संपूर्ण काँग्रेस पक्षच छत्रपती शिवरायांचा अपमान करत आहे.




