अमरावती रेल्वेच्या डब्यात तरुणाची आत्महत्या
रेल्वे स्थानक परिसरात खळबळ; मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू?

अमरावती /15 फेब्रुवारी : स्थानिक रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी एका तरुणाने रेल्वे गाडीच्या स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंदाजे 35 वर्षे वयोगटातील या तरुणाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. भरवस्तीत असलेल्या या रेल्वे स्थानकावर घडलेल्या या थरारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अमरावती रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये हा प्रकार घडला. सकाळी काही प्रवाशांना रेल्वेच्या स्वच्छतागृहाचा दरवाजा बराच वेळ बंद असल्याचे आढळले. संशय आल्याने रेल्वे प्रशासनाला कळवण्यात आले. रेल्वे पोलिसांनी दरवाजा उघडला असता, आत एका तरुणाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. सदर तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याच्याकडे कोणतीही ओळख पटवणारी कागदपत्रे किंवा चिठ्ठी सापडलेली नाही. पोलीस आता या तरुणाची ओळख पटवण्यासाठी परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासत आहेत.




