शेतकर्यांसाठी आज मदतीचा आदेश काढणार ः मुख्यमंत्री
बेलोरा विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद

अमरावती /24 सप्टेंबर : अमरावती विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची भीषण झळ पोहोचली असून पिके पूर्णपणे संकटात आली आहेत. या संकटसमयी शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी मी स्वतः या भागाचा दौरा केला आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता, राज्य शासनाकडून शेतकर्यांना तातडीने मदत दिली जाईल. यासाठी दुष्काळ संहितेच्या ’ट्रिगर एक’ नुसार देण्यात येणार्या मदतीचा अधिकृत आदेश आज शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी काढण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिली.
वाशिम येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावती विमानतळावर विभागीय आयुक्त नयना गुंडे, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रोजगार वाढवण्यासाठी तलावांमधील गाळ काढणार
दुष्काळाच्या काळात ग्रामीण भागात हाताला काम मिळण्यासाठी जलसंधारणाच्या कामांवर मोठा भर दिला जाणार आहे. जिल्ह्यातील जलसाठे आटल्यामुळे जलकुंभांमधील गाळ काढणे, जलतारा स्ट्रक्चर’ निर्माण करणे आणि दुरुस्तीची गरज असलेल्या तलावांची तातडीने दुरुस्ती करून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा होत आहे. ज्या शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली आहे, त्यांना बँकांनी नियमाप्रमाणे नवीन पीक कर्ज दिलेच पाहिजे, असे कडक निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबतच, शेतकर्यांच्या शेतमालाची शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.





