बडनेरा रेल्वे स्थानकावरील दुचाकी चोरटा गजाआड

पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीला ठोकल्या बेड्या

बडनेरा / 8 एप्रिल– येथील रेल्वे स्थानकावर तिकीट खिडकीवर नोंदणी लिपिक म्हणून कार्यरत असलेले रुपेश बागडे यांनी 31 मार्च 2026 रोजी आपली बजाज सी.टी. 100 क्रमांकाची दुचाकी रेल्वे स्थानकाच्या नोंदणी कार्यालयासमोर उभी केली होती. मात्र, काही वेळातच एका अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी बागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली होती. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अक्षय संजय गवई यानेच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने शोध घेत त्याला बडनेरा परिसरातूनच ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे चोरीला गेलेली दुचाकी मिळून आली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, हा आरोपी अमरावती शहरातील गाडगेनगर, शहर कोतवाली आणि फेजरपुरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एक सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.सदरची यशस्वी कामगिरी लोहमार्ग नागपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे, पोलीस उपनिरीक्षक बागुल, पोलीस अंमलदार राहुल हिरोडे, दावर खान, शंकर नेहारे, पवन वघारे, शरद जुनघरे आणि उल्हास जाधव यांचा समावेश होता. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या चोरीच्या गुन्ह्यात त्याला कोणाची मदत लाभली होती का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button