लालखडीचा रिंग रोड की नरकयातना?
साचलेले सांडपाणी अन् दुर्गंधीचा विळखा

* डेंग्यू मलेरियामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अमरावती/3 एप्रिल; शहरातील लालखडी परिसरातील रिंग रोडची अवस्था सध्या एखाद्या नरकयातनेपेक्षा कमी नाही. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या रस्त्यावर सांडपाणी साचून त्याचे रूपांतर आता एका अथांग डबक्यात झाले आहे. या घाणीमुळे स्थानिक रहिवाशांचे जगणे कठीण झाले असून, परिसरात डेंग्यू, हिवताप आणि चिकनगुनिया यांसारख्या जीवघेण्या आजारांचा विळखा घट्ट होत आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचेच आरोग्य आता टांगणीला लागले आहे. या रस्त्यावर पावसाळा असो वा उन्हाळा, सांडपाणी साचलेलेच असते. विशेष म्हणजे, अडीच महिन्यांपूर्वी निवडणुका पार पडल्या आणि नवीन नगरसेवकही निवडून आले, मात्र इथली परिस्थिती ’पहिले पाढे पन्नास’ अशीच आहे. हे दूषित पाणी आता लगतच्या वस्त्यांमध्ये शिरू लागल्याने घरटी आजारपण पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शाळेत जाणार्या कोवळ्या जीवांना दररोज याच चिखलातून आणि घाणीतून वाट काढावी लागते, ज्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ’इन्साफ युवा शक्ती’ संघटनेचे अध्यक्ष यासीर भारती यांनी या प्रश्नी प्रशासनाला जाब विचारला असून, तातडीने पक्की नाली बांधून पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली आहे. जर वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत, तर जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशारा यासीर भारती यांनी दिला आहे.
प्रशासनाचे डोळे उघडणार का?
साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांचे साम्राज्य वाढले असून लहान मुले सतत आजारी पडत आहेत. हा केवळ स्वच्छतेचा प्रश्न नसून लोकांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. महापालिकेने तातडीने पक्के ड्रेनेज लाईनचे काम सुरू करावे, हीच आमची माफक अपेक्षा आहे.
– यासीर भारती (अध्यक्ष, इंसाफ युवा शक्ती)




