तब्बल साडेतीन महिन्यानंतरही मृताची ओळख कायम
अद्यापही शिराळा शिवारातील तरुणाची हत्या गुलदस्त्यात ?

मारेकर्यांनी ओळख पटू नये म्हणून जाळला मृतदेह
अमरावती /25 फेब्रुवारी : शिराळा गावातील शेत शिवारात एका अज्ञात तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आणि मृताची ओळख पटू नये यासाठी त्याचा मृतदेह जाळण्याचा अघोरी प्रयत्न केला. वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली असून, घटनेला साडेतीन महिने उलटूनही अद्याप या मृत तरुणाची ओळख पटू शकलेली नाही. साडेतीन महिन्यांपूर्वी म्हणजेच 6 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. शिराळा गावाजवळील एका शेतात कापूस वेचणीसाठी काही मजूर जात असताना त्यांना अचानक एका कोपर्यातून धूर निघताना दिसला. काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी मजूर जवळ गेले असता तिथे एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या मजुरांनी तातडीने वलगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त शिंदे यांनी ताफा घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराची बारकाईने पाहणी केली. तपासादरम्यान असे दिसून आले की, हा तरुण अंदाजे 20 ते 25 वयोगटातील असून त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने अनेक खोलवर वार करण्यात आले आहेत. मारेकर्यांनी केवळ हत्या करून थांबले नाहीत, तर त्यांनी ओळख लपवण्यासाठी मृतदेहाचा चेहरा आणि अंगावरील कपडे जाळले होते. यावरून हा खून अत्यंत नियोजनबद्ध आणि रागाच्या भरात केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी मृत तरुणाचे छायाचित्र असलेले हस्तपत्रक शहरभर लावले असून नागरिकांना ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन-शिराळा परिसरात आढळलेला हा तरुण साधारण 20 ते 25 वर्षांचा असून त्याच्याबद्दल काहीही माहिती मिळाल्यास तातडीने वलगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. पोलीस उपायुक्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तपास करत असून, नागरिकांनी या तपासात सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




