तान्हा पोळ्याने शहर दुमदुमल

चिमुकल्यांनी सजवले मातीचे सुंदर बैल

ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत लुटला आनंद

अमरावती/11सप्टेंबर- मोठ्या पोळ्यानंतर दुसर्‍या दिवशी साजरा होणारा तान्हा पोळा अमरावती शहरात यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. रविनगर, भाजी बाजार, गाडगेनगर, नवसारी, दस्तूरनगर, बडनेरा, गोपालनगर, एकवीरा देवी आणि अंबादेवी मंदिर परिसरात बालगोपाळांसाठी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच सजवलेले बैल घेऊन चिमुकले उत्साहात पोळ्याच्या ठिकाणी दाखल झाले. मुलांनी माती आणि लाकडाच्या बैलांना रंग, फुले, घंटा आणि घुंगरू लावून आकर्षक सजावट केली होती. काही मुलांनी स्वतःच्या कल्पनेतून बैल सजवले. घरात पूजा केल्यानंतर हे बैल घेऊन मुले नातेवाईक आणि परिचितांच्या घरी गेली. तेथे बैलांची पूजा करून हरळीची काकडी आणि खोबर्‍याचा नैवेद्य दाखवण्यात आला. तान्हा पोळ्यानिमित्त उभारलेल्या मंडपांमध्ये खेळणी आणि खाऊची दुकाने सजली होती. मुलांनी पालकांसोबत खेळणी, खाऊ आणि विविध वस्तूंची खरेदी केली. ज्येष्ठांनी मुलांना आशीर्वाद देत पैसे आणि भेटवस्तू दिल्या. गाडगेनगर आणि नवसारी येथील मैदानांवर ढोलताशांच्या गजरात चिमुकल्यांनी आनंद लुटला. शहरभर तान्हा पोळ्याच्या निमित्ताने जुन्या परंपरेचा उत्साह आणि बालगोपाळांचा जल्लोष पाहायला मिळाला.

Back to top button