श्रीचंद तेजवाणी, सचिन भेंडेंच्या हाती महानगरपालिकेची सुत्रे
पालकमंत्री बावनकुळे, आ.रवि राणा यांच्या साक्षींने अमरावतीची नवी पहाट

अमरावती / 9 फेब्रुवारी : स्थानिक महानगरपालिकेच्या राजकीय आणि प्रशासकीय क्षितिजावर आज एका नव्या ऊर्जेचा उदय झाला. नवनिर्वाचित महापौर श्रीचंद तेजवाणी आणि उपमहापौर सचिन भेंडे यांनी सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेला हा सोहळा केवळ पदग्रहणाचा नसून, अमरावतीच्या सर्वांगीण विकासाचा नवा संकल्प ठरला. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार रवि राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. एका सामान्य कार्यकर्त्याला शहराच्या सर्वोच्च स्थानी बसवून लोकशाहीचा खर्या अर्थाने सन्मान झाल्याची भावना यावेळी उपस्थितांमध्ये उमटत होती.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आमदार प्रताप अडसड, आमदार राजेश वानखडे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सोहळ्याच्या प्रारंभी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक आणि माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी मान्यवरांचे उत्साही स्वागत केले. संपूर्ण सभागृह नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मनोगतातून नवनियुक्त पदाधिकार्यांना विकासाचा कानमंत्र दिला. ते म्हणाले की, अमरावती महानगरपालिका ही केवळ एक इमारत नसून ती शहराच्या प्रगतीचे मुख्य केंद्र आहे. नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आता श्रीचंद तेजवाणी आणि सचिन भेंडे यांच्या खांद्यावर आहे. हे नेतृत्व कार्यक्षम आणि जनतेशी नाळ जोडलेले आहे. राज्य शासन शहराच्या पायाभूत विकासासाठी, स्वच्छतेसाठी आणि आरोग्य सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत आहे. या संधीचे सोने करून सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षभेद बाजूला ठेवून शहराच्या प्रगतीसाठी एकत्र यावे. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिकेने तत्पर राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आमदार रवि राणा यांनी आपल्या दमदार भाषणात नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, शहराचा विकास साधताना लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता या तिन्ही घटकांमध्ये समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. रस्ते, पाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करून अमरावतीला विदर्भातील एक आदर्श शहर बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. मी आमदार म्हणून या विकासकामात महापालिकेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देतो.
उपमहापौर सचिन भेंडे यांनी यावेळी सर्व नगरसेवकांचे आणि सहकार्यांचे मनःपूर्वक आभार मानले. महापालिकेला अधिक सक्षम आणि जनसेवेसाठी तत्पर करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असा शब्द त्यांनी यावेळी दिला. आपल्या भाषणात त्यांनी शहराच्या तळागाळातील नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्यावर विशेष भर दिला.
सर्वांचे आकर्षण ठरलेले नवनिर्वाचित महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अत्यंत नम्रपणे आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून ही मोठी जबाबदारी सोपवली, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. अमरावती शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करणे हेच माझे पहिले उद्दिष्ट असेल. बदलत्या काळानुसार महापालिकेला मिळालेल्या विशेषाधिकारांचा वापर करून आम्ही शहराचा चेहरामोहरा बदलून टाकू. नागरिकांनी आणि मान्यवरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांना तडा जाऊ न देता आम्ही दिवस-रात्र काम करू.या सोहळ्याला भारतीय जनता पक्ष, युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांसह विविध पक्षांचे गटनेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावतीच्या राजकीय इतिहासातील हा एक संस्मरणीय सोहळा ठरला.
विकासाचा नवा आराखडा-नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच शहराच्या विकासासाठी काही महत्त्वाचे संकल्प जाहीर केले आहेत. यामध्ये अमरावती शहर कचरामुक्त करणे, आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणे आणि महापालिकेचे कामकाज अधिक पारदर्शक व जलद करणे यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः महिला आणि बालकांसाठी नवीन कल्याणकारी योजना राबवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले असून, प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.




