पश्चिम विदर्भावर शिंदे सेनेचे लक्ष

वर्‍हाडात पुन्हा शिवसैनिकांचे राज्य येणार

* गावागावात चार हजार शाखा उघडणार

अमरावती /20 मे – प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आ. बच्चू कडू यांचा शिवसेनेत समावेश करून त्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर, आता शिंदे गटाच्या शिवसेनेने विदर्भ प्रांतात आपली संघटनात्मक पाळेमुळे घट्ट करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या वर्‍हाड प्रांतावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. पश्चिम विदर्भ क्षेत्राशी संबंधित शिंदे सेनेच्या नेत्यांची नुकतीच मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पश्चिम विदर्भाच्या मातीत ’जिथे गाव तिथे शाखा’ आणि ’प्रत्येक घरात शिवसैनिक’ ही मोहीम राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, या मोहिमेचा शुभारंभ आगामी 31 मे रोजी माऊलींचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा येथून होणार आहे.
मुंबईत पार पडलेली शिंदे सेनेच्या विदर्भातील नेत्यांची ही बैठक पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिल्ली दौर्‍यावर जावे लागल्यामुळे, त्यांच्या अनुपस्थितीत ही बैठक मृदा व जलसंधारण मंत्री तसेच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आणि विदर्भ विभागीय नेते आ. बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे, अमरावती महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक दिनेश बूब आणि महिला नेत्या प्रीती बंड प्रामुख्याने उपस्थित होत्या. या बैठकीत पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांमधील प्रत्येक गावागावात शिवसेनेच्या 4 हजार पेक्षा जास्त नवीन शाखा उघडण्याचे आणि 1 लाखापेक्षा अधिक तरुणांना नवीन शिवसैनिक म्हणून पक्षाशी जोडण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सिंदखेड राजा येथून या मोहिमेची सुरुवात झाल्यानंतर पक्षाचे नेते संपूर्ण विदर्भ क्षेत्राचा दौरा करणार आहेत. तसेच, संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आगामी 24 मे रोजी नागपूर आणि 26 मे रोजी अमरावती विभागासाठी दोन स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, यात दोन्ही विभागांतील 11 जिल्ह्यांमधील पक्ष विस्तारावर सखोल चर्चा केली जाईल.

शेतकर्‍यांचा सन्मान होणार

आगामी 6 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमरावतीच्या दौर्‍यावर येत असून, गाडगे नगर येथील गाडगे बाबा समाधी मंदिरासमोरील मैदानावर भव्य जनसभा होणार आहे. या सभेतून शेतकरी संघर्ष व सन्मान यात्रेचा जाहीर शुभारंभ करण्यात येणार आहे

संबंधित बातम्या

Back to top button