शहरात फाजिला जबीन मृत्यू प्रकरणात तीव्र संताप

नागपूर येथील संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी व्हावी

* खटल्यासाठी नामांकित सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याची मागणी

अमरावती/20 मे- विवाहानंतर अवघ्या चार महिन्यांतच अमरावतीच्या सुपुत्रीचा नागपुरात संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, या क्रूर हत्येचा तपास करून दोषींना फाशी देण्याची आणि खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून डव्होकेट उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची जोरदार मागणी मुस्लिम समाजाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
अमरावती शहरातील सौदागरपुरा भागातील रहिवासी असलेल्या फाझिला जबीन हिचा विवाह नागपूर येथील शेख जुबेर शेख जलील याच्याशी अत्यंत थाटामाटात झाला होता. संसाराची पाऊले नीट पडण्यापूर्वीच, 15 मे रोजी जुबेरच्या शेजार्‍याने फाझिलाच्या माहेरच्यांना दूरध्वनीवरून तिचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती दिली. या निरोपाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, घटनास्थळाची परिस्थिती पाहता फाझिलाचा मृत्यू नैसर्गिक नसून तिचा छळ करून तिची क्रूर हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.
या घटनेमुळे अमरावतीत कमालीचे संवेदनशील वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र आक्रोश आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, यासाठी जिल्हाधिकार्‍यांमार्फत सरकारला एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. हा खटला न्यायालयात भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य शासनाने तातडीने प्रख्यात सरकारी वकील डव्होकेट उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन सोपवताना गुड्डू हमीद, खालिद पैलवान, राजा ठेकेदार, तौहीद खान, शाहरुख खान, अत्तरउल्ला, ए. अख्तर, जलालुद्दीन पठाण, मोहम्मद उजैर, जावेद खान, नौशाद अली आणि तालीब खान यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि अमरावतीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. फाझिलाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button