शहरामध्ये वैद्यकीय पेपर फुटीने खळबळ
खासगी शिकवण्यांवर त्वरित बंदी आणा

* माजी खा.अनंत गुढे यांची मागणी
अमरावती/20 मे- वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचा गोपनीय पेपर फुटल्यामुळे केंद्र सरकारवर परीक्षा रद्द करण्याची मोठी नामुष्की ओढवली आहे. या गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेकडून अनेक बड्या सरकारी अधिकार्यांना आणि खाजगी शिकवणी वर्ग चालकांना अटक करण्यात आली आहे. या दुर्दैवी प्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून, नैराश्यातून काही विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण भीषण परिस्थितीला केंद्रीय शिक्षण मंत्रालय, मान्यताप्राप्त महाविद्यालये आणि व्यावसायिक खाजगी शिकवण्या ही तिहेरी व्यवस्थाच पूर्णपणे जबाबदार असल्याचा थेट आरोप माजी खा. अनंत गुढे यांनी केला आहे.
उच्च शिक्षणाशी संबंधित असणार्या सर्व खाजगी शिकवण्यांवर केंद्र सरकारने तात्काळ कायदेशीर बंदी घातली पाहिजे, अशी आग्रही मागणी माजी खा. अनंत गुढे यांनी केली आहे. सध्या या खाजगी शिक्षण संस्थांवर शासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. कोणतीही ठोस नियमावली, अधिकृत परवाना पद्धती किंवा सरकारी देखरेख नसल्यामुळे हा खाजगी शिकवण्यांचा बाजार बेफाट वाढला आहे. पालकांकडून अवाढव्य शुल्क वसूल करून विद्यार्थी आणि पालकांचे आर्थिक व मानसिक शोषण केले जात आहे. यामध्ये सरकारी मान्यताप्राप्त महाविद्यालये देखील तितकीच दोषी आहेत, कारण अनेक कॉलेजचे शिक्षक स्वतःच्या नातेवाईकांच्या किंवा ओळखीच्या खाजगी शिकवण्यांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या गरीब पालकांवर दबाव टाकतात, असे गुढे यांनी स्पष्ट केले. पेपर फुटण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही वैद्यकीय प्रवेश परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे पेपर फुटल्याची उदाहरणे आहेत, मात्र प्रशासनाकडून कधीही ठोस कारवाई झाली नाही. खाजगी शिकवणी चालक आपल्या संस्थेचे नाव मोठे करण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात. आज हा खाजगी शिक्षणाचा धंदा 20 हजार कोटी रुपयांपेक्षा मोठा झाला असून, यात सत्ताधार्यांचेही लागेबांधे असल्याचा आरोप त्यांनी केला. या खाजगी दुकानांना टाळे ठोकून अकरावी आणि बारावीच्या वर्गांमध्येच सरकारी शिक्षकांमार्फत दर्जेदार शिक्षण दिल्यास सर्वसामान्य घरातील मुलांचे भविष्य सुरक्षित होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.




