तडीपारांची बडनेरा शहरात दहशत; पोलिसांचे दुर्लक्ष

भाजी बाजारात टोळक्यांचा धुडगूस; नागरिक भयभीत

चहा टपरीवर गुन्हेगारांचे अड्डे; बंदोबस्त वाढवा

बडनेरा /21 सप्टेंबर– शहरातील भाजी बाजार आणि आझाद चौकात तडीपार गुन्हेगारांसह त्यांच्या साथीदारांची उघड दादागिरी सुरू असल्याने नागरिक आणि व्यापार्‍यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. चौकाचौकात पोलिसांनी तडीपारांचे फलक लावले खरे मात्र हेच गुन्हेगार दिवसरात्र टपर्‍यांवर तळ ठोकून बसत असल्याने पोलिसांच्या कारवाईचा फज्जा उडाला आहे. काही तरुणांकडे घातक हत्यारे असल्याची चर्चा असल्याने एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच जुन्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून गस्त वाढवावी अशी एकमुखी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.बडनेरा शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा पार बोजवारा उडाल्याचे विदारक चित्र सध्या उघडपणे पाहायला मिळत आहे. भाजी बाजार तसेच आझाद चौकासारख्या सतत गजबजलेल्या भागात सकाळपासून ते अगदी मध्यरात्रीपर्यंत संशयास्पद तरुणांचे मोठे घोळके उभे राहत आहेत. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी चौकांमध्ये तडीपार गुन्हेगारांचे फलक लावून जनजागृतीचा आव आणला होता. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती नेमकी उलटी झाली असून हेच गुन्हेगार आणि त्यांचे साथीदार चौकांमध्ये छाती फुगवून वावरताना दिसत आहेत. पोलिसांच्या प्रतिबंधात्मक आदेशाची साधी भीतीसुद्धा या लोकांच्या मनात उरलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा वचक नेमका कोणावर असा संतप्त सवाल आता चौकाचौकातून विचारला जात आहे.भाजी बाजार आणि आझाद चौक परिसरातील चहाच्या टपर्‍या तसेच पानाच्या गाड्यांवर या टवाळखोरांचे कायमचे अड्डे बनले आहेत. या टोळक्यांमध्ये आधीच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या काही जुन्या गुन्हेगारांचा उघड समावेश आहे. उगीचच रस्त्यावर थांबून सर्वसामान्य नागरिक आणि महिलांकडे बघणे, दुकानांसमोर अडचण निर्माण करून व्यापार्‍यांवर दरारा निर्माण करणे असे प्रकार रोजचे झाले आहेत. यामुळे बाजारात खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांमध्ये कमालीचे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. तडीपार व्यक्ती स्वतः समोर येत नसली तरी तिचे नातेवाईक आणि साथीदार मात्र परिसरात सर्रास वावरत आहेत. तडीपाराच्या इशार्‍यावरच हा सर्व मनमानी कारभार सुरू असल्याची उघड चर्चा बडनेरा शहरात चवीने चर्चिली जात आहे.या सगळ्या गंभीर प्रकारात सर्वात जास्त धडकी भरवणारी बाब म्हणजे जमणार्‍या टोळक्यातील काही जणांकडे गावठी कट्टे आणि तीक्ष्ण हत्यारे असल्याची कुजबुज नागरिकांमध्ये आहे. एखादी मोठी हाणामारी किंवा रक्ताचा सडा पडल्यावरच पोलीस यंत्रणा जागी होणार का असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक थेट विचारत आहेत. याशिवाय गेल्या काही दिवसांत भाजी बाजार आणि आझाद चौकात काही अनोळखी परप्रांतीय चेहर्‍यांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संवेदनशील चौकात हे लोक कोणाच्या सांगण्यावरून बसतात आणि त्यांची पार्श्वभूमी काय याची कोणतीही साधी चौकशी स्थानिक पोलिसांकडून होताना दिसत नाही. कोणतीही अप्रिय घटना घडण्याआधी अशा संशयितांची ओळख पटवणे नितांत गरजेचे झाले आहे. शहरात शांतता नांदावी यासाठी पोलिसांनी रात्रगस्त वाढवून तात्काळ कारवाई करावी.

Back to top button