एअर इंडियाच्या उड्डाण प्रशिक्षण अकादमीला आता वेग
अमरावती विमानतळाच्या केंद्राला ‘एअर इंडिया’ची 10 विमाने

अमरावती /21 सप्टेंबर- अमरावतीत उभारण्यात येत असलेल्या एअर इंडियाच्या उड्डाण प्रशिक्षण अकादमीला आता वेग मिळाला आहे. अकादमीसाठी पायपर पीए-28 चेरोकी प्रकारची दहा नवी विमाने उपलब्ध झाली असून आणखी 21 विमाने लवकरच दाखल होण्याची अपेक्षा आहे. देशातील एअर इंडियाची ही पहिली उड्डाण प्रशिक्षण अकादमी असून येत्या काही महिन्यांत तिचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावतीसह विदर्भाच्या विमान प्रशिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. अकादमीत प्रशिक्षण घेणार्या नव्या वैमानिकांना प्रत्यक्ष उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यासाठी या विमानांचा वापर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा विमाने अकादमीच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. उर्वरित 21 विमाने आल्यानंतर प्रशिक्षणाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अकादमीचे काम पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर येथेवैमानिक प्रशिक्षणाच्या हालचालींना चांगलाच वेग येण्याची अपेक्षा आहे. अमरावतीत उड्डाण प्रशिक्षणाचे मोठे केंद्र उभे राहिल्याने स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही वाढण्याची शक्यता आहे. प्रशिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, प्रशिक्षक आणि इतर कर्मचारी यामुळे शहरातील विविध व्यवसायांना चालना मिळू शकते. विमान प्रशिक्षणाच्या नकाशावर अमरावतीचे नाव ठळकपणे पुढे येण्यास या अकादमीमुळे मदत होणार आहे. विदर्भातील तरुणांना वैमानिक प्रशिक्षणासाठी नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
दहा विमानांनी वाढला प्रशिक्षणाचा वेग-अकादमीला मिळालेल्या दहा नव्या पायपर पीए-28 चेरोकी विमानांमुळे प्रशिक्षणासाठी आवश्यक ताफ्याची सुरुवात झाली आहे. आणखी 21 विमाने दाखल झाल्यानंतर वैमानिकांच्या प्रशिक्षणाच्या फेर्या वाढवता येणार आहेत. त्यामुळे अमरावतीतील अकादमीचे कामकाज अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.





