उधारीच्या वादातून वृद्धाची हत्त्या

तरोडा जगताप गावात भरदिवसा थरारक घटना

अमरावती/11 सप्टेंबर– कुर्‍हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरोडा जगताप येथे उधारीच्या पैशांच्या जुन्या वादातून 50 वर्षीय आरोपी अरुण भीमराव ठाकरे याने लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून 55 वर्षीय दादाराव तुकाराम बोरकर यांचा जागीच खून केला असून, मयत वृद्धाची पत्नी इंदिरा दादाराव बोरकर यांच्या फिर्यादीवरून कुर्‍हा पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.
तरोडा जगताप गावात उधारीच्या पैशांवरून आधीपासूनच दोघांमध्ये धुसफूस सुरू होती. आज सायंकाळच्या सुमारास दोघेही समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून अचानक जोरदार बाचाबाची झाली. शिवीगाळ वाढल्याने आरोपी अरुण भीमराव ठाकरे याचा पारा चढला आणि त्याने संतापाच्या भरात हातातील लाकडी दांड्याने दादाराव तुकाराम बोरकर यांच्यावर जोरदार घाव घालण्यास सुरुवात केली. डोक्यात आणि अंगावर लाकडी दांड्याचे सपासप वार बसल्याने दादाराव बोरकर गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळावरच तडफडून करुण अंत झाला. भरवस्तीत घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे गावात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताचकुर्‍हा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने तरोडा जगताप गावातील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा उरकून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याप्रकरणी मयताची पत्नी इंदिरा दादाराव बोरकर वय 52 वर्षे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अरुण ठाकरे याच्यावर गुन्हा नोंदवून पुढील कारवाई वेगाने सुरू केली आहे. उधारीच्या पैशांवरून संसाराची राखरांगोळी-तरोडा गावात जुन्या पैशांच्या उधारीवरून वाद एवढा टोकाला गेला की दादाराव बोरकर यांचा नाहक बळी गेला. आरोपी अरुण ठाकरे याने रागाच्या भरात केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे बोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले असून कुर्‍हा पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत वेगाने करत आहे.

Back to top button