गणेशोत्सवात विघ्न येणार नाही
मात्र सरकारने ‘विघ्न’ बनू नये, मुंबई आंदोलनावरून जरांगेंचा इशारा

वडीगोद्री /11 सप्टेंबर : मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी मुंबईत धडकणार्या एकाही आंदोलकाकडून पवित्र गणेशोत्सवात कसलेही विघ्न येणार नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणार्या मुख्यमंत्र्यांनी गणे शोत्सवाचा मूळ इतिहास समजून घ्यावा. लोकसमूहाने एकत्र येऊन अन्याया विरोधात आवाज उठवावा म्हणूनच या उत्सवाची परंपरा सुरू झाली होती. त्यामुळे आंदोलक शांततेचे पालन करतील, पण सरकारने स्वतः ’विघ्नाच्या भूमिकेत’ येऊ नये, असा थेट आणि सज्जड इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. अंतरवाली सराटी येथे शुक्रवारी (दि. 11) त्यांच्या बेमुदत उपोषणाच्या चौदाव्या दिवशी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबई आंदोलनाची आणि शनिवारच्या महाबैठकीची रूपरेषा मांडली.
मनोज जरांगेंचा मुंबई आंदोलनाचा मार्ग मोकळा-शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. मनोज जरांगे-पाटील यांचा मुंबईकडे होणारा नियोजित मोर्चा रोखण्यासाठी आणि या कार्यक्रमाबाबत कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालय सुनावणी करत होते.





