मनपाची पाच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई
4 हजारांचा दंड वसूल

अमरावती/29सप्टेंबर : महानगरपालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छता तसेच प्लास्टिकमुक्त परिसरासाठी जनजागृती व तपासणी मोहीम राबविण्यात आली. अंबादेवी मार्केट व गांधी चौक परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, विक्री व साठवणूक तसेच परिसरातील स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त (1) भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे तसेच सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर (झोन क्र. 2) यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान दुकानदारांकडे ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी दोन डस्टबिन उपलब्ध आहेत का, तसेच त्यांचा प्रत्यक्ष वापर केला जात आहे का, याची पाहणी करण्यात आली. डस्टबिनचा वापर न केल्याप्रकरणी पाच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गुप्ताजी यांच्यावर 500, योगेश स्टोअर्स यांच्यावर 1,000, पूजा बांग्लस यांच्यावर 500, रोशन गुप्ता (दूध डेअरी) यांच्यावर 1,000, तर संजय इंगोले यांच्यावर 1,000 असा दंड आकारण्यात आला. या कारवाईत एकूण 4,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक श्रीकांत डवरे, स्वास्थ्य निरीक्षक मिथुन उसरे, धनिराम कलोसे, सचिन सैनी व मिथुन वाघमारे यांच्यासह महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. महानगरपालिकेच्या वतीने नागरिक व व्यावसायिकांनी परिसर स्वच्छ ठेवावाअसे आवाहन करण्यात आले.





