पुस्तकी ज्ञानासोबतच सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्व विकास महत्वाचा
कुलगुरू डॉ.मिलींद बारहाते यांचे प्रतिपादन

* संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ‘युवा संस्पर्श 2026’ युवा महोत्सवाचे बुलढाण्यात थाटात उद्घाटन
अमरावती /29 सप्टेंबर : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान अपुरे असून करिअर आणि यशासाठी सॉफ्ट स्किल्स अन् व्यक्तिमत्त्व विकास अत्यंत महत्त्वाचा ठरतो, असा ठाम विश्वास संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मिलिंद बारहाते यांनी व्यक्त केला. बुलढाण्यातील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात चार दिवसीय आंतर महाविद्यालयीन ’युवा संस्पर्श 2026’ युवा महोत्सवाच्या दिमाखदार उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. महोत्सवात विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महोोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातून आलेल्या तरुणांनी कलागुणांची मुक्त उधळण केली. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, प्र-कुलगुरू महेंद्र ढोरे, द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशनच्या सचिव पद्माबाई सावळे, सहसचिव कीर्तीताई न्हाममोड, व्यवस्थापन परिषद सदस्य विजय नागरोडे, रासेयो संचालक निलेश कडू, विद्यार्थी विकास मंडळ संचालक राजीव बोरकर, प्राचार्य जयंत कावळे, विजय बोरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महोत्सवात तब्बल अठ्ठावीस विविध कलाप्रकारांचे थरारक सादरीकरण होणार असून, सहस्रोंच्या संख्येने तरुण कलाकार सहभागी झाले आहेत. पारदर्शक व वस्तुनिष्ठ मूल्यमापनाद्वारे निवडले जाणारे गुणवंत संघ राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास व्यक्त करत प्रशासनाने उपस्थितांना व्यसनमुक्त व तंदुरुस्त जीवन जगण्याची शपथ दिली. या सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणार्या राज्यभरातील गुणवंत विद्यार्थी व अधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये हर्षिल किरण पाटील, श्रावणी प्रमोद आपोतिकर, निखिल बाळू सिसो, निहाल लक्ष्मीकांत आसमोपा, वेध विवेक बारबुले, प्रणाली विनोद पिंपळकर, लक्ष्मीकांत कामीपांडे, राम मेघे, शुभम ठाकरे, नेत्राजी मानकर, सागर गवई, नारायणराव गावंडे, असळता गावंडे, तक्षशिला मोटघरे, रवींद्र मळदकर या विद्यार्थ्यांचा व अधिकार्यांचा समावेश होता. दीप प्रज्वलन व राष्ट्रगीतानंतर सुरू झालेल्या या रंगारंग महोत्सवाने संपूर्ण परिसरात एकच उत्साह निर्माण केला आहे.





