शिक्षकांना पैठणी अन् दोन हजारांचे पाकीट महागात!

अमरावती शिक्षक मतदारसंघातील लाचखोरीची ‘एसआयटी’ चौकशी

लाभार्थी शिक्षकांच्या मागे लागणार चौकशीचा ससेमिरा
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, दिले चौकशीचे आदेश
शाळांमधील सीसीटीव्ही फुटेज ठरणार मुख्य पुरावा

अमरावती/30 सप्टेंबर  : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाच शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारी एक गंभीर बाब समोर आली आहे. शिक्षक आ. किरण सरनाईक यांच्याकडून पैठणी साडी आणि दोन हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारणार्या शिक्षक मतदारांची आता थेट चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कथित लाचखोरीची राज्य शासनाने ‘एसआयटी’मार्फत चौकशी लावल्याची माहिती समोर आल्याने संबंधित शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
आ. सरनाईक यांच्या वाशिम येथील शिवाजी शिक्षण संस्थेतील तब्बल 250 कर्मचारी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत पैठणी व कौटुंबिक भेटीच्या नावाखाली पैशांचे पाकीट घेऊन शाळा-महाविद्यालयांमध्ये फिरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळा व महाविद्यालयांच्या कामकाजावर परिणाम होत असून, तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपचे संभाव्य उमेदवार चंद्रशेखर भोयर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवाजी शिक्षण संस्थेतील कर्मचारीही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शिक्षकांच्या निवडणुकीत लक्ष्मी दर्शन देवून नैतिक मुल्य धुळीस मिळवणार्या आ. सरनाईक यांच्या लाचखोरीचा सर्वप्रथम पर्दाफाश दै.आपली मातृभूमिने केला होता.
खुलेआम लाचखोरी अन् तक्रारीचा धमाका
मिळालेल्या माहितीनुसार, आ.किरण सरनाईक यांनी गेल्या चार महिन्यांपासून अमरावती,बुलढाणा, अकोला, आणि वाशीम जिल्ह्यातील शिक्षक मतदारांना पैठणी आणि दोन हजार रुपयांची पाकिटे खुलेआम वाटल्याचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात सरनाईक यांच्या बंधू आणि चिरंजीवांनी अमरावती ग्रामीण व शहरी भागातील शाळांमध्ये जाऊन थेट मतदारांना ही लाच वाटल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकाराविरोधात भाजपचे संभाव्य उमेदवार चंद्रशेखर भोयर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली होती. या गंभीर तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ एसआयटी चौकशीचे आदेश दिले असून, लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे भोयर यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाची दखल
या प्रकरणाची निवडणूक आयोगही दखल घेण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेत ’सीसीटीव्ही’ कॅमेरे अनिवार्य आहेत आणि त्यांचे फुटेज किमान 3 महिने जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. सरनाईक यांच्या नातेवाईकांनी शाळांमध्ये जाऊन केलेले हे वाटप सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, एसआयटीसाठी हे फुटेज अत्यंत भक्कम पुरावा ठरणार आहे.

मुख्याध्यापक आणि शिक्षक रडारवर!
फक्त पैसे आणि साड्या घेणारे शिक्षकच नाही, तर ज्या शाळांना निवडणूकीच्या तोंडावर आमदार निधीतून ’प्रिंटर’ देण्यात आले, त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी खरोखरच प्रिंटरची मागणी केली होती का, याचीही कसून चौकशी होणार आहे.
निवडणुकीच्या या रणधुमाळीतच ही चौकशी सुरू होणार असल्याने, कायदेशीर अडचणीत सापडण्याच्या भीतीने अनेक लाभार्थी शिक्षकांनी गुप्तपणे वकिलांचा सल्ला घेण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या धडक कारवाईमुळे आ. किरण सरनाईक यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, संपूर्ण अमरावती विभागात या घटनेने एकच खळबळ उडवून दिली आहे.

वाशिमच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे कर्मचारी अडचणीत
वाशिमच्या श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे 250 कर्मचारी शाळा व महाविद्यालय सोडून आ.किरण सरनाईक यांच्यासाठी अमरावती विभागातल्या पाचही जिल्ह्यात प्रचार व भेटवस्तु देत सुटलेले आहे. त्यामूळे शिक्षण संस्थेमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेवून मी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकाराची तक्रार केली व त्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे भाजप नेते चंद्रशेखर भोयर यांनी आपली मातृभूमिशी बोलतांना स्पष्ट केले.

Back to top button