मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांची आधार शहरी बेघर निवारा केंद्राला सदिच्छा भेट

निवारावासींशी साधला जिव्हाळ्याचा संवाद

* अमरावतीकरांना सहकार्याचे आवाहन

अमरावती/11 मे: मायेची ऊब आणि प्रशासकीय संवेदनशीलतेचा एक आगळावेगळा प्रत्यय रविवारी अमरावतीकरांना पाहायला मिळाला. जागतिक माता दिनाचे औचित्य साधून महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी आपल्या परिवारासह ’आधार शहरी बेघर निवारा केंद्राला’ सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी केवळ सोयीसुविधांची पाहणीच केली नाही, तर तिथल्या निराधार बांधवांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवत त्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले.
केंद्रात पाऊल ठेवताच आयुक्तांनी तिथल्या स्वच्छतेचे आणि शिस्तीचे कौतुक केले. त्यांनी प्रत्येक विभागाची बारकाईने पाहणी करून बेघरांसाठी राबवल्या जाणार्‍या उपक्रमांची माहिती घेतली. मात्र, हे केवळ सरकारी काम न ठरता एका कौटुंबिक भेटीचे स्वरूप धारण करून गेले. आयुक्त लड्डा यांनी बेघर बांधवांशी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन अडचणी आणि गरजा जाणून घेतल्या. त्यांच्या या आपुलकीच्या बोलण्याने निवारा केंद्रातील वातावरण भारावून गेले होते. अनेक निराधारांना आपल्या घरातीलच कुणीतरी हक्काची व्यक्ती भेटायला आल्याचा भास झाला आणि त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. निराधारांची सेवा करणे ही केवळ सरकारी जबाबदारी नसून ते एक मोठे सामाजिक ऋण आहे, अशा शब्दांत आयुक्तांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. समाजातील प्रत्येक घटकाने या कामात आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी केले. या भेटीत त्यांच्यासोबत सहायक आयुक्त धनंजय शिंदे, भूषण पुसतकर, अभियंता राजेश आगरकर आणि पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. निवारा केंद्राचे संचालक राजीव बसवनाथे, व्यवस्थापिका ज्योती राठोड, रोहित घोंगडे, विलास थोरात आणि किशोर मरकाम यांनी आयुक्तांचे स्वागत केले. ही भेट बेघरांना भविष्यात जगण्याची नवी उमेद देऊन गेली.

संबंधित बातम्या

Back to top button