अगरबत्ती कारखान्याला भीषण आग
अंसार नगरात सिलिंडर स्फोटामुळे आगीचे प्रचंड लोळ

अमरावती /28 सप्टेंबर- शहरातील अंसार नगर ते विलास नगर रस्त्यावरील फारुख भाई पारले वाले यांच्या अगरबत्ती आणि लोबान कारखान्याला मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण परिसर हादरून गेला असून सिलिंडरच्या कानठळ्या बसवणार्या स्फोटामुळे आगीने क्षणात 25 ते 30 फूट रौद्र रूप धारण केले, तर अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले, यात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
शहरातील अंसार नगर भागात फारुख भाई पारले वाले यांचा अगरबत्ती आणि लोबान बनवण्याचा कारखाना आहे. सोमवारी मध्यरात्री 12 ते 12.30 च्या दरम्यान या बंद कारखान्याला अचानक आग लागली. कारखान्यात अगरबत्ती व लोबानचा मोठा साठा असल्याने आग काही क्षणातच वेगाने भडकली. त्यातच आत ठेवलेल्या सिलिंडरचा प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने गाढ झोपेत असलेला संपूर्ण परिसर हादरून गेला. आगीचे 25 ते 30 फूट उंच लोळ आभाळात उसळताना दिसू लागले. कारखान्याला लागूनच असलेल्या झोपडपट्टी भागातील नागरिकांनी आगीचे हे भयानक रूप पाहताच घराबाहेर पळ काढला. भीतीने लहान मुले व महिला रस्त्यावर आल्याने एकच गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाली. नागरिकांनी तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला फोन करून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या 4 ते 5 गाड्या सायरन वाजवत तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सुरुवातीला आगीची तीव्रता आणि धुराचे लोट प्रचंड असल्याने जवानांना पुढे जाणे कठीण होत होते. मात्र जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा जोरदार मारा सुरू केला. स्थानिक पोलिसांनीही तातडीने धाव घेऊन नागरिकांची गर्दी बाजूला करत रस्ता मोकळा केला. मध्यरात्री कारखाना पूर्ण बंद असल्याने आत कुणीही कामगार नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. आगीत लाखो रुपयांचा कच्चा माल, तयार अगरबत्ती आणि यंत्रसामग्री जळून भस्मसात झाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून तपास सुरू आहे.





