अॅड. यशोमती ठाकूर यांच्या घरावर ड्रोनच्या घिरट्या
गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जीवाला मोठा धोका असल्याचा आरोप
अमरावती /28 सप्टेंबर – काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अमरावतीमधील घराभोवती अचानक ड्रोन फिरवून छायाचित्रे काढल्याचा गंभीर प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणाची रीतसर लेखी तक्रार त्यांनी गाडगेनगर पोलिसांत दाखल केली आहे.
शहरातील गणेडीवाल लेआऊट भागात माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचे निवासस्थान आहे. या घरावर संशयास्पद ड्रोन घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले. या अज्ञात ड्रोनच्या माध्यमातून घराचे तसेच आजूबाजूच्या परिसराचे छायाचित्रण करण्यात आले. भरवस्तीत एका बड्या लोकप्रतिनिधीच्या घरावर अशा प्रकारे पाळत ठेवल्यासारखे ड्रोन फिरू लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेत थेट गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून अधिकृत तक्रार नोंदवली.
आपल्या निवासस्थानावर अशा रीतीने नियमबाह्य ड्रोन फिरवूनछायाचित्रे टिपल्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. या संशयास्पद प्रकारामागे नेमके कोण लोक आहेत, याचा छडा
लावून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना यशोमती ठाकूर यांनी आपल्या जीविताला धोका असल्याची थेट भीती व्यक्त केली. ड्रोनच्या साहाय्याने परिसराची माहिती गोळा करून भविष्यात घातपात घडवण्याचा कट असू शकतो, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून ड्रोन उडवणार्या संशयितांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.





