11 विभागांतील अधिकारी-कर्मचार्यांच्या सुट्ट्या रद्द?
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अॅक्शन मोडवर

महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय
हिंगोली/28 सप्टेंबर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रशासनाला कामाला लावले आहे. दुष्काळ निवारणाचे काम करणार्या महसूल, कृषी, जिल्हा परिषद, पाणीपुरवठा, वीज, पशुसंवर्धन आणि जलसंपदा विभागांसह 11 विभागांतील अधिकारी व कर्मचार्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांनी यासंदर्भात आदेशही काढले आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यातील आराटी येथे पिकांची पाहणी केल्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील सुमारे 75 टक्के भाग दुष्काळाच्या परिस्थितीत असल्याचा दावा त्यांनी केला. सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून कापूस आणि इतर पिकांनाही फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. कापसाचे पीक वरून हिरवे दिसत असले तरी पाते आणि बोंडांची स्थिती समाधानकारक नसल्याचेही त्यांनी नमूद केले.दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीमंत्रिमंडळ उपसमिती काम करत आहे. राज्यातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. विमा आणि एनडीआरएफच्या निकषांनुसार उपलब्ध होणार्या मदतीचा विचार केला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.





