केंद्रीय कृषी मंत्री पथकासह महाराष्ट्र दौर्‍यावर

3 ऑक्टोबरला राज्यातील दुष्काळाची करणार पाहणी

महाराष्ट्राच्या दुष्काळाची केंद्राकडून दखल

मुंबई /28 सप्टेंबर : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्र सरकार 3 ऑक्टोबर रोजी विशेष पथके पाठवणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे झालेल्या ‘राष्ट्रीय रब्बी मोहीम 2026’ परिषदेत ही माहिती दिली. चौहान यांनी आपणही आपल्या पथकासह दोन्ही राज्यांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे सांगितले.
केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. महाराष्ट्राने राज्यस्तरावर दुष्काळ जाहीर केला असून, राज्यातील जवळपास दोन-तृतीयांश भागाला या संकटाचा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटकातही पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे चौहान यांनी स्पष्ट केले.
यंदा अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे सध्या सुरूअसलेल्या खरीप हंगामातील पिकांसोबतच आगामी रब्बी हंगामाच्या नियोजनासमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.रब्बी हंगामाची पेरणी करण्यापूर्वी उपलब्ध सिंचनाचे पाणी आणि जमिनीतील ओलावा याचा अंदाज घेण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या आहेत. ज्या भागात पाणी कमी आहे, तिथे जास्त पाणी लागणार्‍या पिकांऐवजी कमी पाण्यावर येणार्‍या पिकांची निवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Back to top button