किरीट सोमय्यांच्या बैठकीवरून हायव्होल्टेज ड्रामा

एमआयएम आणि ठाकरे गटाचा विरोध, जोरदार नारेबाजी

अमरावती /11 जून- महानगरपालिकेत गुरुवारी भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या बैठकीवरून हायव्होल्टेज ड्रामा झाला. महापालिकेत कथित ’जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या’वर चर्चा करण्यासाठी सोमय्या आले असता, एमआयएम आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना राजकीय नेत्याला बैठक घेण्याची परवानगी कशी दिली, असा सवाल करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला.दुपारी ठीक 2:30 वाजता किरीट सोमय्या यांच्या वाहनांचा ताफा महापालिकेत पोहोचताच एमआयएम आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. ’किरीट सोमय्या वापस जाओ’, ’सोमय्या मुर्दाबाद’ अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून सोडला होता. अखेर आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना पुढे यावे लागले, हे विशेष.
गाडीसमोर लोटांगण; पोलिसांनी नगरसेवकांना फरफटत नेले-एमआयएमचे गटनेते अब्दुल हमीद आणि नगरसेवक मुनज्जर अली हे कमालीचे आक्रमक झाले होते. सोमय्या यांची गाडी रोखण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी थेट त्यांच्या वाहनासमोर उड्या टाकल्या आणि रस्त्यावर लोटांगण घातले. यामुळे महापालिकेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अब्दुल हमीद आणि मुनज्जर अली यांना रस्त्यावरून फरफटत बाजूला नेले. यावेळी पोलिस उपायुक्त श्याम घुगे, रमेश धुमाळ हे उपस्थित होते. पाच नगरसेवकांसह 25 जण पोलिसांच्या ताब्यात नंतर सुटका-या अचानक झालेल्या गदारोळानंतर महापालिका परिसरात तैनात असलेल्या सिटी कोतवाली पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी पाच नगरसेवकांसह अंदाजे 20 ते 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 68 अन्वये नोंद करून सुटका करण्यात आली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सोमय्या यांनी आयुक्तांच्या दालनात बैठक पार पाडली.

Back to top button