मोठ्या इमारतींना वेगळा तर सर्वसामान्यांच्या घरांना स्वतंत्र दर
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

अमरावती /11 जून- राज्य शासनाने रेडी रेकनर दर निर्धारणात ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला असून यात मोठ्या इमारतींना वेगळा तर सर्वसामान्यांच्या घरांना स्वतंत्र दर लागू होईल. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर भूमिका स्पष्ट केली. रेडी रेकनर दराबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, आतापर्यंत मोठ्या व्यावसायिक इमारती आणि छोट्या घरांना अनेक ठिकाणी समान दर लागू होत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत होता. आता राज्य शासनाने ‘मायक्रो झोन’ संकल्पना स्वीकारली असून परिसर, बांधकामाचा प्रकार आणि मालमत्तेच्यस्वरूपानुसार स्वतंत्र रेडी रेकनर दर निश्चित केले जाणार आहेत. यामुळे मोठ्या इमारतींना वेगळा तर सर्वसामान्यांच्या घरांना स्वतंत्र दर लागू होईल आणि घर खरेदी-विक्रीवरील शुल्काचा भार कमी होईल, असे त्यांनी सांगितले. पीओपी मूर्तींबाबत पर्यावरणपूरक भूमिका-पीओपी मूर्तींबाबत विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे यांनी प्रदूषणमुक्त पर्यायांचा अवलंब करण्यावर शासन भर देणार असल्याचे सांगितले. पर्यावरणाला हानी होणार नाही अशा पद्धतीने मूर्ती निर्मिती व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले
धान घोटाळ्याबाबत चौकशीस तयार
धान घोटाळ्याबाबत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, पटोले यांनी संबंधित कागदपत्रांची प्रत द्यावी. ती प्रत मुख्यमंत्रीला पाठवून विषय मंत्रिमंडळात मांडण्याची तयारी शासनाची असल्याचे त्यांनी सांगितले.




