मनपात बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी किरीट सोमय्या पुन्हा सक्रीय

865 दोषींवर कारवाई करा, 35 हजार प्रमाणपत्रांचेही आता होणार सखोल ऑडिट

अमरावती / 20 फेब्रुवारी : स्थानिक महानगरपालिकेत गाजलेल्या बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र घोटाळ्याला आता राजकीय आणि प्रशासकीय वळण मिळाले असून, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज महापालिकेत धडक देऊन या प्रकरणाचा पंचनामा केला. बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र लाटणार्‍या 865 दोषींविरुद्ध आजपासूनच गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले. विशेष म्हणजे, केवळ जुन्याच नव्हे तर सन 2025 मध्ये वितरित झालेल्या तब्बल 35 हजार प्रमाणपत्रांचेही आता विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात येणार आहे. सोमय्या यांनी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक आणि पोलीस आयुक्त राकेश ओला यांची भेट घेऊन या प्रकरणातील सूत्रधारांना तात्काळ गजाआड करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज अमरावती महानगरपालिकेला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या वितरणाबाबत सविस्तर माहिती घेतली. या गंभीर घोटाळ्याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. चर्चेदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या 865 व्यक्तींनी फसवणूक करून प्रमाणपत्रे मिळवली आहेत, त्यांच्यावर आजपासूनच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानंतर सोमय्या यांनी महापौर श्रीचंद तेजवानी यांच्यासह पोलीस आयुक्त राकेश ओला यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्याच्या सूचना दिल्या. सन 2025 मध्ये वितरित झालेल्या 35 हजार प्रमाणपत्रांवरही संशयाची सुई असल्याने प्रशासनाने या सर्व नोंदींचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जन्म-मृत्यूची नोंदणी ही बालकाच्या भवितव्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असते, मात्र यात झालेला गैरप्रकार हा अत्यंत गंभीर आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या कर्मचार्‍यांपासून ते एजंटांपर्यंत कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला. प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे बोगस प्रमाणपत्रे मिळवणार्‍यांचे आणि वितरण करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
सोमय्यांची धडक : घोटाळेबाजांचे धाबे दणाणले-माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावतीत येऊन आयुक्त आणि पोलीस आयुक्तांची भेट घेतली. 865 गुन्हेगारांवर आजच कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले असून, 2025 मधील 35 हजार प्रमाणपत्रांच्या तपासणीतून मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button