अमरावती महापालिकेत ‘अष्टपैलू’

मीडिया विश्वातून संपादक अनिल अग्रवाल

* कोर्टरुम मधून अ‍ॅड.प्रशांत देशपांडे
* खेळाच्या मैदानातून डॉ.संजय तिरथकर
* मनपा कायदेतज्ञ मिलिंद चिमोटे
* नियोजन व जनप्रतिसाद दिनेश बुब
* आयटीआय व शिक्षण क्षेत्र भोजराज काळे
* पक्ष संघटन व युवा कौशल्य संजय हिंगासपुरे
* एमआयएम पक्षाचा चेहरा मुनब्बर अली

अमरावती / 20 फेब्रुवारी : महापालिकेच्या सभागृहात केवळ लोकनियुक्त प्रतिनिधीच नव्हे, तर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचाही अनुभव कामी यावा, या उद्देशाने स्वीकृत सदस्यांची निवड केली जाते. यंदा अमरावती महानगरपालिकेत ’विधीतज्ञा’पासून ते ’विदर्भ केसरी’पर्यंत आणि ’संपादका’पासून ते ’प्रशासकीय तज्ज्ञां’पर्यंत अशा दिग्गज चेहर्‍यांची वर्णी लागली आहे. सत्तेच्या राजकारणात या ’चाणक्यां’ची भूमिका आगामी काळात कळीची ठरणार आहे.
स्थानिक महानगरपालिकेच्या नवगठित सभागृहाचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून, शुक्रवारी पार पडलेल्या पहिल्या ऐतिहासिक आमसभेत आठ स्वीकृत नगरसेवकांची सन्मानाने निवड करण्यात आली. राजकीय पक्षांच्या संख्याबळावर आधारित या निवडीमध्ये यंदा केवळ राजकारण न पाहता विधी, पत्रकारिता, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. महापौर श्रीचंद तेजवानी आणि महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी नवनियुक्त सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि अधिकृत निर्वाचन प्रमाणपत्र प्रदान केले. या निवडीमुळे महापालिकेच्या सभागृहात आता अनुभवाची शिदोरी आणि अभ्यासू वृत्तीचा संगम पाहायला मिळणार आहे.
महापालिका मुख्यालय स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी 11 वाजता सभेचा प्रारंभ झाला. सभेच्या सुरुवातीला औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवक निवडीचा महत्त्वाचा विषय पटलावर आला. यावेळी भारतीय जनता पक्षाने आपल्या 25 सदस्यांच्या ताकदीवर शहराचे प्रख्यात विधीज्ञ एड. प्रशांत देशपांडे आणि माजी विदर्भ केसरी डॉ. संजय तिरथकर यांना संधी दिली. काँग्रेसने 15 नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीच्या एका सदस्याच्या पाठिंब्यावर दैनिक ’अमरावती मंडल’चे संपादक अनिल अग्रवाल आणि माजी महापौर मिलिंद चिमोटे या दोन अनुभवी नावांची घोषणा केली.
दुसरीकडे, 15 सदस्य असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाने शहराध्यक्ष संजय हिंगासपुरे यांना सभागृहात पाठवले आहे. विशेष म्हणजे, शिंदे सेना, शिवसेना (ठाकरे गट) आणि बहुजन समाज पार्टी अशा 8 सदस्यांच्या एकत्रित गटाने माजी नगरसेवक दिनेश बूब यांच्या अनुभवावर विश्वास टाकत त्यांना पुन्हा एकदा सभागृहात संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने भोजराज काले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, तर 12 सदस्य असलेल्या एमआयएमने सय्यद मुनज्जर अली सय्यद मुदस्सर अली यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली. या सर्व आठही नावांना सभागृहाने सर्वसंमतीने मान्यता दिली असून, उपमहापौर सचिन भेंडे आणि नगर सचिव वडूरकर यांनीही नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले.
कायद्याचा कस आणि वारशाची जोड: एड. प्रशांत देशपांडे-प्रशासकीय कामकाजात कायद्याची गुंतागुंत सोडवण्यासाठी एड. प्रशांत देशपांडे यांच्या रूपाने महापालिकेला एक अनुभवी कायदेतज्ज्ञ मिळाला आहे. माजी महापौर विद्याताई देशपांडे यांचा वारसा आणि स्वतःचा प्रदीर्घ कायदेशीर अनुभव, यामुळे सभागृहातील चर्चेचा स्तर उंचावण्यास मदत होईल. नाट्य आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या सक्रियतेमुळे शहराच्या सांस्कृतिक विकासालाही गती मिळण्याची शक्यता आहे.
आखाड्यातील ’केसरी’ आता सभागृहात: प्रा. डॉ. संजय तीरथकर-कुस्तीच्या मैदानात ’विदर्भ केसरी’ म्हणून दबदबा निर्माण करणारे प्रा. डॉ. संजय तिरथकर आता मनपाच्या राजकीय आखाड्यात उतरले आहेत. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर अमरावतीचे नाव नेणार्‍या तिर्थकरांच्या अनुभवाचा फायदा शहरातील क्रीडा सुविधांच्या सक्षमीकरणासाठी होईल.
मिलिंद चिमोटे यांची ’हॅट्ट्रिक-माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी सलग तिसर्‍यांदा स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात प्रवेश करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. डॉ. सुनील देशमुख यांचे विश्वासू सहकारी आणि महापालिकेच्या फाईलवरची न् फाईल माहिती असलेले व्यक्तिमत्व, अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा धाक विरोधकांवर नक्कीच राहील.
राजकीय चाणक्य अन् ’विदर्भाचा राजा’: दिनेश बूब-शिवसेनेच्या मुशीतून तयार झालेले दिनेश बूब हे अमरावतीमधील सर्वपरिचित नाव. ’विदर्भाचा राजा’ गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी जनमानसात आपले स्थान निर्माण केले आहे. आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकीचा अनुभव गाठीशी असल्याने, राजकीय डावपेचात ते निष्णात मानले जातात.
निष्ठा आणि वारसा: संजय हिंगासपुरे-युवा स्वाभिमान पार्टीचे खंदे समर्थक संजय हिंगासपुरे यांनी आपली निष्ठा सिद्ध करत हे पद मिळवले आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते शंकरराव हिंगासपुरे यांचा राजकीय वारसा आणि तैलिक समाजाचे प्रतिनिधित्व, ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे.
प्रशासकीय पकड असलेले भोजराज काळे-खढख संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न मांडणारे भोजराज काळे हे तांत्रिक आणि प्रशासकीय कामात माहीर आहेत. आमदार संजय खोडके यांच्या गोटातील एक विश्वासू चेहरा म्हणून त्यांची ओळख असून, धोरणात्मक निर्णय घेण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असेल.
चखच ची नवीन खेळी: मुनब्बर अली-पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एम.आय.एम. ने मुनब्बर अली यांच्यावर विश्वास टाकला आहे. अल्पसंख्याक बहुल भागातील नागरी समस्या मांडण्यासाठी ते पक्षाचा मुख्य आवाज म्हणून सभागृहात काम करतील.

संबंधित बातम्या

Back to top button