तिवस्यात तरुणाची निर्घृण हत्या

राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री थरार झोपेतच साथीदाराने केला घात

* रक्ताने माखलेला चाकू अन् दुचाकी घटनास्थळी; मारेकरी पसार

तिवसा / 20 फेब्रुवारी : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. गुजरातच्या राजकोट येथील विमल सतीश अग्रावत (30) या तरुणाची त्याच्याच काळ बनून आलेल्या साथीदाराने चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केली. भरधाव दुचाकीवरून आलेल्या या दोघांनी विश्रांतीसाठी हायवेवरील विसावा निवडला खरा, पण तिथेच एकाचा करुण अंत झाला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, भररस्त्यात झालेल्या या खुनामुळे पोलीस प्रशासनाची झोप उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह तिवसा पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी नाकेबंदी केली असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. मिळालेली सविस्तर माहिती अशी की, नवी भारवाडी येथील 60 वर्षीय चौकीदार जानराव ठाकरे हे राष्ट्रीय महामार्गावरील आयआरबीच्या ट्रक ले-बाय पार्किंगमध्ये कार्यरत आहेत. पहाटे 4 वाजेच्या सुमारास एका केशरी रंगाच्या स्पोर्ट्स दुचाकीवरून दोन तरुण तिथे पोहोचले. आम्हाला इथे थोडा वेळ झोपू द्या, असे सांगून त्यांनी तिथेच मुक्काम ठोकला. सकाळी 7 वाजेपर्यंत हे दोन्ही तरुण तिथेच होते. मात्र, जानराव ठाकरे हे जेव्हा थोड्या वेळासाठी आपल्या घरी गेले आणि 7:30 वाजताच्या सुमारास परत आले, तेव्हा त्यांना तिथे मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले.
विमल अग्रावत हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला होता. त्याच्या मानेवर आणि शरीरावर चाकूने खोलवर वार करण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे, त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण घटनास्थळावरून गायब होता. बाजूलाच रक्ताने माखलेला एक धारदार चाकू आणि विमलची ’एमएच 47 बी 9131’ क्रमांकाची दुचाकी पडून होती. ठाकरेंनी तत्काळ तिवसा पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता, मृताच्या बॅगेत आधार कार्ड, मोबाईल आणि दुचाकीची नंबर प्लेट मिळून आली, ज्यावरून त्याची ओळख पटली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथका पाचारण करण्यात आले. हा खून जुन्या वादातून झाला की ऐनवेळी काही बिनसले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. राजकोट येथील मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला असून, फरार मारेकर्‍याचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना झाली आहेत.
खाकीचा शब्द: मारेकरी लवकरच गजाआड!-प्राथमिक तपासणीत मृत विमल सतीश अग्रावत (30, रा. राजकोट) याची ओळख पटली असून त्याच्या नातेवाईकांना कळविण्यात आले आहे. चौकीदार जानराव ठाकरे यांच्या बयाननुसार, विमलसोबत असलेला त्याचा साथीदार सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत. घटनास्थळावरून चाकू व इतर साहित्य जप्त केले असून लवकरच आरोपीला बेड्या ठोकल्या जातील.
– गोपाल उपाध्याय, पोलीस निरीक्षक, तिवसा.

संबंधित बातम्या

Back to top button