आधुनिक पाकगृहाचे उद्घाटन, सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण निर्देश
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

*मध्यवर्ती कारागृहात ‘अभिविक्षक मंडळा’ची त्रैमासिक बैठक संपन्न
अमरावती /30 सप्टेंबर : मध्यवर्ती कारागृह येथे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली कारागृह अभिविक्षक मंडळाची त्रैमासिक बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कारागृह परिसराची प्रत्यक्ष पाहणी व समस्यांचा आढावा बैठकीदरम्यान जिल्हाधिकार्यांनी सर्व विभागांच्या प्रतिनिधींसह कारागृहातील संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यांनी पाकगृह, रुग्णालय, मुलाखत कक्ष, धान्य गोदाम, उपहारगृह, सुतारकाम विभाग, ग्रंथालय, रेडिओ कक्ष, मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्ष, बंदी बरॅक आणि अतिसुरक्षा कक्षाला भेट देऊन माहिती घेतली व समस्या जाणून घेतल्या. तसेच, डीपीडीसी अंतर्गत आधुनिकीकरण करण्यात आलेल्या नवीन पाकगृहाचे उद्घाटन जिल्हाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक सोयीसुविधांनी युक्त काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. याशिवाय व्हीसी क्युबिकल्स कक्षास भेट देऊन ऑनलाइन कोर्टपेशी, वकील व नातेवाईकांच्या मुलाखतींच्या सादरीकरणाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.
कारागृहातील विद्युत व्यवस्था विनाखंड सुरू राहण्यासाठी एक्स्प्रेस फीडर बसवून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच वायरिंग दुरुस्तीची कामे डीपीडीसी निधीतून पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सुरक्षेच्या कारणास्तव कारागृहाबाहेरील हायवेच्या बाजूने व्ह्यू-कटर बसवण्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. बंद्यांना वेळेवर न्यायालयात आणि वैद्यकीय उपचारासाठी नेण्यासाठी पोलीस पथकाची कमतरता भासू नये, म्हणून कारागृह व पोलीस विभागाने दरमहा समन्वय बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. बंद्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी ’कार वॉशिंग सेंटर’चे काम पूर्ण करण्याचे आणि सोलर प्रशिक्षणासोबतच इतर नवीन कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्याचे निर्देश दिले. ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करणे, ई-बाईक, सोलर यंत्रणा आणि इतर पायाभूत सुविधा वाढवण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम, पोलीस उपायुक्त प्रांजली सोनावणे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी नरेंद्र वानखेडे, अशासकीय सदस्य धनानंद नागदिवे, कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी, उपअधीक्षक प्रदीप इंगळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी देवराव जाधव, अंतर्गत सुरक्षा अधिकारी धनसिंग कवाळे, तुरुंगाधिकारी हेमंत इंगोले, कारागृह शिक्षक ललित मुंडे, संजय घोलप उपस्थित होते.





