महावितरणची कामे सुधारा अन्यथा खांबाला बांधीन

आ.राजेश वानखडे भोंगळ कारभारावर संतापले

शेतकर्‍यांची पिके सुकल्याने संतापाचा उद्रेक

अमरावती /28 सप्टेंबर- ग्रामीण भागात विजेच्या लपंडावामुळे शेतकर्‍यांची पिके वाळत असून तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्‍या महावितरण अधिकार्‍यांना तिवसा मतदार संघाचे आ. राजेश वानखडे यांनी खडे बोल सुनावले. वीजपुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास रस्त्यावर आणून थेट विजेच्या खांबाला बांधण्याचा इशारा त्यांनी दिला. ऐन हंगामात वीज नसल्याने संतापलेल्या बळीराजाच्या समस्येवरून लोकप्रतिनिधी थेट आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले.
गेल्या 5-6 महिन्यांपासून ग्रामीण भागात विजेचा लपंडाव अखंडपणे सुरू आहे. रात्रंदिवस वीज गायब राहत असल्याने शेतात उभी असलेली कपाशी आणि तूर पूर्णपणे वाळण्याच्या मार्गावर आहे. सोयाबीनचा हंगाम आधीच हातचा गेला असून आता इतर पिकेही नष्ट होत आहेत. हवालदिल शेतकरी कार्यालयात तक्रार करण्यासाठी संपर्क साधतात, तेव्हा कर्मचारी मदत करण्याऐवजी ग्राहक क्रमांकाची विचारणा करून त्यांना ताटकळत ठेवतात. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.
शेतकर्‍यांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत आ. राजेश वानखडे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना जाब विचारला. तांत्रिक बिघाड आणि अतिरिक्त भाराचे जुनेच कारण पुढे करणार्‍या अधिकार्‍यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. वरिष्ठांशी चर्चा करून तत्काळ अतिरिक्त व्यवस्था उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. शेतकर्‍यांना वेठीस धरणे त्वरित थांबवा, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी अधिकार्‍यांना दिला.

अधिकारी केवळ ग्राहक क्रमांक विचारतात
रात्रीच्या वेळी शेतातील अथवा घरातील वीज अचानक गायब झाल्यावर शेतकरी महावितरणच्या कार्यालयात फोन लावतात. मात्र कर्मचारी अडचणी सोडवण्याऐवजी आधी ग्राहक क्रमांक सांगा असा हेका धरतात. विजेअभावी पिके जळून खाक होत असताना ही चालढकल थांबवून थेट वीज सुरळीत करा अशी मागणी संतप्त शेतकर्‍यांनी केली.

Back to top button