3 ऑक्टोबरला भव्य मंदिर विश्वस्त महापरिषद

राज्यभरातील विश्वस्तांचे अमरावतीत होणार मंथन

मंदिर संरक्षणासाठी अभ्यासपूर्ण महापरिषदेचे आयोजन

अमरावती /27 सप्टेंबर  : अमरावतीच्या जनार्दन पेठेतील एकविरा मंगळ कार्यालयात येत्या शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी मंदिर विश्वस्त महापरिषद 2026 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. धर्मादाय कार्यालय अमरावती आणि महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही महत्त्वाची परिषद पार पडत असून, यादरम्यान राज्यभरातील मंदिर विश्वस्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जगद्गुरू रामराजेश्वराचार्य महाराज यांनी केले आहे. श्री रुक्मिणी विदर्भ पीठ अंबिकापूर कौंडण्यपूर येथील महाराजांनी हे आवाहन केले असून, नुकतीच त्यांना निमंत्रण पत्रिकाही भेट देण्यात आली. या महापरिषदेत मंदिरांचे संरक्षण व संवर्धन, देवस्थानांचे व्यवस्थापन, विश्वस्तांसमोरील कायदेशीर व प्रशासकीय प्रश्न तसेच मंदिर संस्थांमध्ये समन्वय आणि संघटन या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालणार्‍या या संमेलनात राज्यभरातील विविध देवस्थानांचे विश्वस्त, पदाधिकारी आणि संबंधित प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्नांवर सामूहिक मंथन करून भविष्यातील कार्यदिशा निश्चित करण्यासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मंदिरांच्या सुरक्षेसाठी आणि विश्वस्तांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे मार्ग काढण्यासाठी सर्व मंदिर विश्वस्तांनी या महापरिषदेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, अशी आग्रही विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे. निमंत्रण देताना कैलासकुमार पनपालिया, निलेश ढबळवार, धनराज बोलुळकर, आशिष मूरुडकर, श्रीकृष्ण माहोरे, देशोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button