अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अंधाराचे साम्राज्य!

कार्डियक वॉर्डमध्ये लाईट-पंखे बंद; लिफ्टही कित्येक दिवसांपासून बंद, रुग्णांचे हाल

अमरावती /5 ऑगस्ट: अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अर्थात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या रुग्णालयातील कार्डियक वॉर्डमध्येच लाईट आणि पंखे बंद असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
कार्डियक वॉर्डमध्ये रुग्ण उपचारासाठी दाखल असताना अचानक लाईट बंद झाल्याने संपूर्ण वॉर्ड अंधारात गेल्याचे दिसून आले. त्यातच पंखेही बंद असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ज्या रुग्णालयात हृदयविकाराच्या गंभीर रुग्णांवर उपचार केले जातात, त्याच कार्डियक वॉर्डमध्ये अशी परिस्थिती असेल, तर संपूर्ण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या व्यवस्थेची अवस्था काय असेल? असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.
लिफ्ट बंद; रुग्णांना पायर्‍यांचा आधार-इतकेच नव्हे, तर रुग्णालयातील लिफ्ट गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असल्याची माहिती समोर येत आहे. नवीन लिफ्ट बसवण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे रुग्णांना वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी पायर्‍यांचा वापर करावा लागत आहे.गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी पायर्‍यांवरून ये-जा करणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे. काही रुग्णांना स्ट्रेचर किंवा बेडवरून हलवण्यासाठीही मनुष्यबळाची गरज असते. मात्र, साधा बेड हलवण्यासाठीही वॉर्ड बॉय उपलब्ध नसल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहेत.
कार्डियकसारख्या संवेदनशील विभागात वीज आणि पंख्यांची सुविधा खंडित होणे ही केवळ गैरसोय नसून रुग्णांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे. रुग्णालय प्रशासन आणि संबंधित शासन यंत्रणा या समस्यांकडे किती गांभीर्याने पाहणार? बंद लिफ्ट कधी सुरू होणार? कार्डियक वॉर्डमधील वीज आणि पंख्यांची समस्या कधी दूर होणार? तसेच रुग्णांना बेड हलवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ कधी उपलब्ध करून दिले जाणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता रुग्णालय प्रशासन आणि शासनाने देणे गरजेचे आहे. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना सुविधा मिळणार की गैरसोयींचाच सामना करावा लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button