ख्रिस्तमरण सोहळ्याने भाविक झाले गहिवरले

* भक्तिभावात बुडाला संपूर्ण ख्रिस्ती धर्मग्राम

अमरावती /3एप्रिल : प्रभू येशू ख्रिस्ताने मानवजातीच्या कल्याणासाठी क्रूसावर दिलेल्या बलिदानाचा स्मृतीप्रीत्यर्थ साजरा होणारा ’शुभ शुक्रवार’ (गुड फ्रायडे) सेंट फ्रान्सिस झेवियर महामंदिरात अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी झालेल्या क्रूसमार्गापासून ते सायंकाळच्या प्रभूच्या दुःखभोगाच्या उपासनेपर्यंत, प्रत्येक विधीत ख्रिस्ताने सोसलेल्या वेदनांचे चिंतन करताना भाविक गहिवरून गेले होते.
सकाळच्या कोवळ्या उन्हात संपूर्ण धर्मग्रामवासीयांनी एकत्र येत ’क्रूसमार्ग’ विधीला सुरुवात केली. प्रभू येशूंना सुळावर चढेपर्यंत सोसाव्या लागलेल्या अमानवीय छळाचे स्मरण यावेळी करण्यात आले. गावातील चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच या श्रद्धेच्या वाटेवर चालताना ख्रिस्ताच्या दुःखया तनेचा अनुभव घेतला. सायंकाळी ठीक 6 वाजता मुख्य धार्मिक विधींना प्रारंभ झाला. या सोहळ्याचे मुख्य पौरोहित्य माननीय महागुरू मॅल्कम यांनी केले. या पवित्र प्रसंगी त्यांना फ्र. ओनिल गोंसाल्विस, फ्र. मॅथ्यू करिक्कल, फ्र. अविनाश कुमरिया आणि फ्र. डॅनियल खांडुल यांनी मोलाचे सहकार्य केले. महागुरू मॅल्कम यांनी आपल्या हृदयस्पर्शी प्रवचनातून उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. ते म्हणाले की, प्रभू येशूने क्रूसावर खिळले असतानाही आपल्या मारेकर्‍यांना क्षमा केली, हाच जगातील सर्वात मोठा प्रेमाचा संदेश आहे. प्रत्येक धर्मग्रामवासीयाने ख्रिस्ताचा हा त्याग आणि क्षमाशीलतेचा आदर्श आपल्या जीवनात जपला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. प्रार्थनेच्या वेळी मंदिरातील वातावरण अत्यंत शांत आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेले होते. रात्री उशिरापर्यंत भाविक प्रार्थनेत तल्लीन झाले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एक वेगळीच पवित्रता जाणवत होती.

संबंधित बातम्या

Back to top button