अमरावतीत जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिक त्रस्त
विलास इंगोले यांचा गंभीर आरोप

* प्रशासनावर वाढला नाहक दबाव
अमरावती/18 जून– स्थानिक महानगरपालिकेत जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रमाणपत्रांसाठी लोकांना वारंवार मनपा कार्यालयाच्या फेर्या माराव्या लागत आहेत. या गंभीर मुद्द्यावरून मनपाचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी राज्य सरकारच्या आयटी प्रणाली आणि प्रशासकीय कार्यपद्धतीवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.
विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी आरोप केला आहे की, राज्य सरकारची डिजिटल व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मूलभूत कागदपत्रे मिळवण्यातही अडचणी येत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमैया यांच्या मनपातील बैठकीनंतर प्रशासनावर नाहक राजकीय दबाव वाढला आहे. किरीट सोमैया यांच्या हस्तक्षेपामुळे कर्मचार्यांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला असून, याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. तांत्रिक अडचणींमुळे सध्या शहरात दरमहा केवळ 2 हजार प्रमाणपत्रे जारी करण्याची मर्यादा आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता ही संख्या अत्यंत कमी आहे. सरकारने येथे आरोग्य अधिकार्याची निबंधक म्हणून नियुक्ती केली असली, तरी व्यवस्थापकीय गोंधळ कायम आहे. दुसरीकडे, विलास इंगोले यांनी मनपाच्या दुटप्पी कर वसुली धोरणावरही तोफ डागली. प्रशासन सामान्य आणि मध्यमवर्गीय मालमत्ताधारकांकडून सक्तीने कर वसूल करत आहे, तर दुसरीकडे बीओटी (बिल्ड-ऑपरेट-ट्रांझिट) तत्त्वावरील व्यावसायिक संकुलांकडे 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर थकबाकी आहे. बड्या थकबाकीदारांवर कोणतीही प्रभावी कारवाई होत नाही. मनपाने यावर ठोस निर्णय घेऊन थकबाकी त्वरित वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.




