अमरावतीमध्ये खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले
नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाची धडक मोहीम

इतवारा शहरातील अनेक दुकाने बंद
अमरावती/18 जुन– अन्न व औषधी प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सूत्रे हाती घेताच राज्यभर सुरू केलेल्या धडक मोहिमेचा धसका अमरावतीकरांनी घेतला असून, शहरातील प्रमुख इतवारा बाजार परिसरात गुरुवारी दुकाने बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. सार्वजनिक आरोग्याशी खेळणार्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने अमरावतीत खळबळ उडाली आहे.
अन्न व औषधी प्रशासनाकडून अन्नाची गुणवत्ता व स्वच्छतेबाबत कडक तपासणी केली जात आहे. इतवारा बाजार परिसरात 20 ते 25 दुकाने असून, तिथे उघड्यावर चिवडा, नमकीन, मिठाई व इतर खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले जातात. अचानक सुरू झालेल्या या तपासणी मोहिमेमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीने व्यापार्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दुकाने बंद ठेवली आहेत. एरवी ग्राहकांची वर्दळ असलेल्या या बाजारपेठेत गुरुवारी शुकशुकाट होता. केवळ इतवारा बाजारच नव्हे, तर शहरातील विविध भागांतील दुकाने व उपाहारगृहात उघड्यावर ठेवलेले पनीर, मिठाई व पॅकिंग नसलेले खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी हटवल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळ्यात अन्नाचे पदार्थ दूषित होऊन आरोग्यावर होणारे घातक परिणाम टाळण्यासाठी प्रशासनाने ही मोहीम तीव्र केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात प्रशासनाकडून उघड्यावरील खाद्यपदार्थ न खाण्याचे आवाहन केले जाते, मात्र यंदा तुकाराम मुंडे यांच्या कडक धोरणामुळे विक्रेते अधिक सतर्क झाले आहेत. प्रशासनाची ही कारवाई जनहिताची असून, अन्नाची गुणवत्ता राखण्यासाठी अशी कडक पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत ग्राहकांमधून व्यक्त होत आहे. सध्या सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे खाद्यपदार्थ विक्री करणार्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, आता कुठे नियमांचे पालन करण्याची जाग व्यापार्यांना आली आहे.
आरोग्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी महत्त्वाची
पावसाळ्यात दूषित अन्नामुळे साथीचे आजार बळावतात, त्यामुळे खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाची ही कठोर मोहीम केवळ दंडात्मक कारवाई नसून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणारा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. प्रत्येक व्यावसायिकाने नियमांचे काटेकोर पालन करणे आता काळाची गरज बनले आहे.




