पत्नीला धमकावून विनयभंग करणार्‍यावर गुन्हा

न्यायालयातील खटला मागे घेण्यासाठी पतीचा दबाव

गाडगे नगर पोलिसांकडून नराधम पतीला दणका

अमरावती/10 मे- न्यायालयात सुरू असलेला खटला मागे घेण्यासाठी एका विवाहितेवर भररस्त्यात दबाव टाकून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना अमरावतीमध्ये समोर आली आहे. आपल्याच पत्नीचा हात धरून तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणार्‍या मुकेश रमेश बुल या पतीविरुद्ध गाडगे नगर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पीडित महिला सध्या प्रचंड दहशतीखाली आहे.34 वर्षीय पीडित महिला आणि तिचा पती मुकेश रमेश बुल (वय 35) यांच्यात गेल्या काही काळापासून वाद सुरू आहे. पती-पत्नीमधील हे भांडण आता न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले असून या प्रकरणाचा खटला सध्या न्यायप्रविष्ट आहे. याच कारणास्तव हे दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. बुधवारी 6 मे रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पीडित महिला कठोरा नाका भागातील एका किराणा दुकानावरून जात असताना ही घटना घडली. आरोपी मुकेशने तिथे येऊन पत्नीला अडवले आणि कोर्टातील तो खटला मागे घेण्यासाठी तगादा लावला. न्यायालयात काहीही होणार नाही, तू तो खटला लगेच मागे घे, असे म्हणत त्याने पीडितेवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.जेव्हा पीडित महिलेने खटला मागे घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला, तेव्हा आरोपी मुकेशचा संयम सुटला. त्याने भररस्त्यात सर्वांसमोर महिलेचा हात पकडला आणि तिला लज्जास्पद वागणूक दिली. माझ्यासोबत घरी चल, असे म्हणत त्याने चुकीच्या इराद्याने तिचा विनयभंग केला. या अनपेक्षित प्रकारामुळे महिलेला प्रचंड मानसिक त्रास झाला आणि तिने स्वत:ची सुटका करून घेत त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, आरोपीने तिथून न हलतो तिला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली. जर तू माझ्यासोबत आली नाहीस, तर गाठ माझ्याशी आहे, असे म्हणत त्याने दहशतीचे वातावरण निर्माण केले. अखेर तिथून निघताना त्याने पुन्हा एकदा धमकी दिली आणि आपल्या दुचाकीवर बसून पसार झाला. या घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ गाडगे नगर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी मुकेश रमेश बुल याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button