दाजीसाहेब-राष्ट्रसंतांचे स्नेहबंध प्रेरणादायी

पद्मश्री जनार्धन बोथे यांचे प्रतिपादन

कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी समाजशक्ती एकवटण्याचे आवाहन

अमरावती/10 मे: कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी आपले आयुष्य वेचणारे नि:स्वार्थी कर्मयोगी पद्मश्री डॉ. शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यातील अतूट स्नेहबंधांचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. दाजीसाहेबांनी उभे केलेले हे सेवाकार्य केवळ अमरावतीसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी एक दीपस्तंभ आहे, असे प्रतिपादन नवनियुक्त पद्मश्री जनार्दन बोथे यांनी केले.
विदर्भ महारोगी सेवा मंडळाच्या तपोवन परिसरात दाजीसाहेब पटवर्धन यांच्या 41 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तपोवन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई, दैनिक प्रतिदिनचे संपादक प्रवीण आहुजा, नगरसेवक विनोद तानबाही, प्रमोद महल्ले, डॉ. गोविंद कासट आणि सुदर्शन गांग उपस्थित होते. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याबद्दल तपोवन परिवारातर्फे जनार्दनजी बोथे यांचा शाल, माउलींची मूर्ती आणि पुस्तक देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य गवई यांनी खंत व्यक्त केली की, दाजीसाहेबांनी विदर्भातील संस्थांच्या एकत्रीकरणासाठी 27 वर्षे लढा दिला, मात्र त्यांना योग्य साथ मिळाली नाही; अन्यथा कुष्ठरुग्णांच्या समस्या केव्हाच सुटल्या असत्या. याप्रसंगी नियामक समितीचे डॉ. प्रतीक राठी, झुबिन दोटीवाला, विवेक अमराते, अश्विन आष्टीकर, भीमराव ढवळे यांचीही उपस्थिती होती. उपसचिव ऋषिकेश देशपांडे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या नवीन उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन माधुरी सहारे यांनी तर आभार प्रदर्शन योगेश करडे यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सहदेव गोळे, निवृत्ती वेळकर, भास्कर शेट्ये, विजय इंगळे, भीमराव उसरे, अरविंद देशमुख, प्रशांत उज्जैनकर, वैशाली मोकासे, नलिनी बेलेकर आणि श्याम शेट्ये यांनी अथक परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

Back to top button