दारू अड्ड्यावर रेल्वे कर्मचार्‍याची निर्घृण हत्या

किरकोळ वादातून घडले हत्याकांड

* विटाळा गावात भरदुपारी थरारक घटना
* हत्येनंतर घटनास्थळावरून आरोपी फरार

अमरावती /10 फेब्रुवारी : एकीकडे मद्याची नशा आणि दुसरीकडे डोक्यात शिरलेलं खुनाचं वारं, यातूनच अमरावती जिल्ह्यातील विटाळा गावात एका निवृत्त रेल्वे कर्मचार्‍याचा अमानुष अंत झाला. सोमवारी भरदुपारी अडीच वाजता विटाळा येथील देशी दारूच्या दुकानात अनिल सुखदेव आव्हाड (63) यांची किरकोळ वादातून लाथाबुक्क्यांनी ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.
अवघ्या काही मिनिटांत घडलेल्या या रक्ताळलेल्या थराराने संपूर्ण धामणगाव रेल्वे तालुका हादरला असून, हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, मूळचे गुंजखेड पुलगाव येथील रहिवासी असलेले अनिल आव्हाड हे सोमवारी विटाळा येथील दारू दुकानात मद्यप्राशन करण्यासाठी गेले होते. तिथे एका अज्ञात इसमासोबत त्यांचा जुन्या कारणावरून वाद उफाळून आला. शब्दाला शब्द वाढत गेला आणि रागाच्या भरात असलेल्या त्या नराधमाने आव्हाड यांना जमिनीवर पाडून त्यांच्यावर तुफान हल्ला चढवला. ही मारहाण इतकी भीषण होती की, शरीराच्या नाजूक भागावर वर्मी घाव बसल्याने आव्हाड यांचा जागीच श्वास तुटला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आव्हाड यांना पाहून गावात एकच खळबळ उडाली. घटनेची खबर मिळताच मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शरद अहेर यांनी तातडीने ताफ्यासह घटनास्थळ गाठले. रक्ताने माखलेला घटनाक्रम पाहता पोलिसांनी तातडीने न्यायवैद्यक पथकाला पाचारण केले. सध्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धामणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. या थरारक हत्याकांडाने विटाळा गावात भीतीचे सावट पसरले असून पोलिसांकडून आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भरदिवसा विटाळा गाव हादरले-विटाळ्याच्या गजबजलेल्या दारू दुकानात भरदुपारी अडीच वाजता हे हत्याकांड घडल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. किरकोळ वादातून एका ज्येष्ठ नागरिकाचा असा अमानुष बळी घेतल्याने कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आता जंगजंग पछाडले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button